महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे विदर्भातील कार्यकर्त्यांची पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी समजूत काढली असून त्यामुळे समाधानी असलेले कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करतील, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर यांनी पत्रकार परिषदेत केला. गवई गटाचे पूर्व विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांंनी आठवले गटात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीत सहभागी रिपाइंच्या आठवले गटाला महाराष्ट्रात केवळ सातारा ही एकमेव जागा देण्यात आली. विदर्भात रामटेक, वर्धेची किमान एक जागा द्यावी, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आठवले गटाच्या विदर्भातील कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. हे समजल्यानंतर पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी अमरावतीमध्ये विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महायुतीत इतर पक्षांची संख्या वाढल्याने जागा कमी मिळाल्या. मात्र, विधान परिषदेसाठी विदर्भातून एक जागा तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान एक विधानसभेची जागा विदर्भात मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. कार्यकर्त्यांची त्यांनी समजूत घातल्याने कार्यकर्ते आता कामाला लागले असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर यांनी केला.
विदर्भासाठी निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष भीमराव बनसोड अध्यक्ष राहतील. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ते प्रभारी राहतील. रामटेक मतदारसंघासाठी आर. एस. वानखेडे, चिमूर-गडचिरोली मतदारसंघासाठी एल. के. मडावी, चंद्रपूरसाठी अशोक मेश्राम, गोंदिया-भंडारासाठी प्रा. पवन गजभिये, वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी राजन वाघमारे हे प्रभारी राहतील. त्यांच्यासह राजू बहादुरे (नागपूर महानगर), दुर्वास चौधरी (नागपूर ग्रामीण), विजय आगलावे (वर्धा), अशोक घोटेकर (चंद्रपूर), मोरेश्वर बोरकर (भंडारा), राजेश रामटेके (गोंदिया), मेघराज घुटके (गडचिरोली) यांचा निवडणूक समन्वय समितीत समावेश राहील. प्रभारी व जिल्हाध्यक्ष त्या-त्या मतदारसंघातील उमेदवार तसेच कार्यकर्त्यांशी प्रचारासाठी समन्वय ठेवतील. म.धा. भोवते, असिफ बागडे, डी.व्ही. बारमाटे, कैलास गेडाम यांच्यासह पूर्व विदर्भातील गवई गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आठवले गटात प्रवेश घेतला असल्याचे थूलकर यांनी जाहीर केले. विदर्भ प्रदेशाध्यक्ष भीमराव बनसोड, राजन वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi athawale campaign for shiv sena bjp candidate in vidarbha
Show comments