आरपीआयच्या आठवले गटाने भाजप-सेना युतीकडे मागितलेल्या एकूण १२ जागांपैकी ७ जागांवरील उमेदवार सोमवारी एकतर्फी जाहीर केले. त्यामध्ये दोन उमेदवार सर्वसाधारण (महिला) जागेवरील आहेत. सेना-भाजपने महायुतीमधील आरपीआयशी शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाविषयी अधिकृत चर्चा केलेली नाही. परंतु पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोका टाळण्यासाठी युती आठवले गटास या जागा देतील असे गर्भित सुतोवाच आरपीआयचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आठवले गटाचे उमेदवार असे: प्रभाग ५ अ- अनसुया भाकरे (अ. जाती), ७ अ- जया गायकवाड (सर्वसाधारण महिला), १४ अ- किरण निकम (अ. जाती), १४ ब- चंद्रकला दिवटे (सर्वसाधारण महिला), १६ अ- जयश्री सुनिल क्षेत्रे (अ. जाती), २८ अ- बाळासाहेब पाटोळे (अ. जाती), ३४ अ-प्रियंका दिनेश निकाळजे (अ. जाती). याशिवाय ४ अ, ६ अ, १५ अ, २५ अ व २६ अ याही जागा आठवले गटाने युतीकडे मागितल्या आहेत.
महायुतीमधील जागा वाटपाबाबत आरपीआयचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांची एकदा सेनेचे निवडणूक प्रमुख आ. गजानन किर्तीकर यांच्याशी चर्चा झाली, त्यावेळी आरपीआयने १२ जागांची मागणी केली, भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी एकदा चर्चा झाली, त्यावेळी आ. कर्डिले यांनी अनुसूचीत जातीसाठी राखीव असलेल्या जागा देण्याचे मान्य केले, मात्र या सर्व चर्चा अनौपचारीक होत्या, युतीने जागा वाटपासाठी अधिकृत निमंत्रण दिलेले नाही, केवळ आमच्यातील जागा वाटप झाल्यावर, दोन्ही बाजूने प्रत्येकी ६-६ जागा आरपीआयला देण्याचे तत्वत: मान्य केले आहे, युतीमधीलच जागावाटप निश्चित न झाल्याने आता त्यांच्यावर अधिक विसंबून न रहाता, जाहीर केलेल्या ७ जागांवर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यात बदल होणार नाही, प्रसंगी त्यासाठी आम्ही स्वबळावर लढू, असे स्पष्ट करतानाच गायकवाड यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी ते आम्हाला १२ जागा देतील, असा इशाराही दिला. यावेळी आरपीआयचे पदाधिकारी भालेराव, नाना पाटोळे, सुनिल साळवे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा