लोकसभेची निवडणूक जाहीर होताच इतर राजकीय पक्षांबरोबरच रिपाइंमध्येही नाराजीचे सूर उमटणे सुरू झाले असून विविध गटांमध्ये विभागलेला रिपब्लिकन पक्ष एकसंघ नसल्याने असे घडत असल्याचे जाणकारांचे स्पष्ट मत आहे.
सध्या रिपाइंचे आठवले, गवई, टी. एम. कांबळे गट, उपेंद्र शेंडे यांचा खोरिप, अण्णा कटारे यांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, विजय मानकर यांचा आंबेडकर राईट्स पार्टी, सुलेखा कुंभारे यांचा बहुजन रिपब्लिकन एकता मंच, सुनील रामटेके यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे), घनश्याम फुसे यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, नारायण बागडे यांचा आंबेडकरी विचार मोर्चा आदी अनेक गट सक्रिय असून सर्वात ताकदवान असल्याचा दावा प्रत्येक गटच करीत असतो.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना झाली. सत्तेतील भागिदारीने दलितांच्या सर्वागीण विकासास चालना मिळेल, असे बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते व त्यासाठी त्यांनी अनेकदा आग्रह धरला होता. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, एन. शिवराज हे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. शिवराज यांच्या निधनानंतर दादासाहेब गायकवाड अध्यक्ष झाले. त्यांच्या कालावधीत फक्त महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसशी युती केली होती. त्याचवेळेस गायकवाड व त्यांच्या उत्तर प्रदेश व पंजाब शाखांमधील समर्थकांनी एकत्रित होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) असा नवा पक्ष स्थापन केला नि रिपब्लिकन पक्षात ही पहिली फूट ठरली.
कालांतराने बॅरिस्टर खोब्रागडे गट व रा.सू. गवई यांचा गट अस्तित्वात आले. त्यानंतर जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा.सू. गवई, खोरिप, दत्ता कट्टी, ईश्वरीबाई असे गट निर्माण झाले. हरिश्चंद्र रामटेके, उमाकांत रामटेके, उपेंद्र शेंडे, परमानंद रामटेके, सुनील रामटेके, यशवंत तेलंग आदींनी अनेकदा गटागटात विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणासाठी प्रयत्न झाले. ते फलद्रुप मात्र ठरले नाहीत. उपेंद्र शेंडे, सूर्यकांत डोंगरे आदी आमदार खोरिपचा वरचष्मा राहिलेल्या उत्तर नागपूरने दिले आहेत. आता विविध गटातील बोटावर मोजण्याइतके आमदार निवडून येतात. यंदा मात्र, लोकसभा निवडणुकीत राकाँने अमरावतीत गवई गटाला उमेदवारी अव्हेरली. महायुतीत गेलेल्या रामदास आठवलेंना राज्यसभेची खासदारकी व लोकसभेसाठी एकमेव सातारा येथे उमेदवारी देण्यात आली. आठवले गटाने विदर्भात रामटेक किंवा वर्धा जागा मागितली होती. त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. रामटेकमधून काँग्रेसने सुलेखा कुंभारे यांना उमेदवारी नाकारली आहे. विविध राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी आर्जव करण्याची वेळ आज रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांवर आली आहे. एकसंघ नसल्यानेच ही वेळ ओढवली असल्याचे जाणकार स्पष्ट सांगतात.
विभाजन केवळ रिपब्लिकन पक्षाचेच झालेले नसून काँग्रेस, साम्यवादींसह अनेक पक्षांमध्ये विभाजन झाले आहे. त्यामुळे जुन्या बाबी उकरून काढण्यात काहीही अर्थ नाही. तरीही आंबेडकर, गवई व आम्ही एकत्र आलो तर संपूर्ण राजकीय चित्रच बदलून जाईल. मात्र, तशी त्यांची इच्छा हवी, असे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व लाँगमार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे यांनी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले. या लोकसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पक्ष सन्मानजनक तडजोड करण्यास तयार आहे. स्वाभिमानी स्वबळावर राज्यातील २१ जागा लढवणार असून त्यात विदर्भातील नऊ जागांचा समावेश आहे. अमरावती मतदारसंघात गवई गटास सहकार्य करण्याची पीरिपाची तयारी आहे, मात्र त्यांनी सहकार्य मागितल्यासच विचार करू, असे कवाडे यांनी सांगितले.