देहव्यापारातील महिलांची स्थिती आजही गुलमांसारखीच आहे. सामाजिक व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या या महिलांच्या शोषणाची समाज व सरकारनेही फारशी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. स्नेहालय संस्थेने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतानाच त्यासाठी भविष्यात भारिप सर्वतोपरी सहकार्य करील असे आश्वासन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिले. स्नेहालयच्या हिंमतग्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. देहव्यापारातून मुक्त झालेल्या महिलांचा सत्कार आठवले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. येथील फळबाग व दुग्ध प्रकल्पाची पाहणी आठवले यांनी केली. सर्वश्री अशोक गायकवाड, अजय साळवे, नाना पाटोळे, श्रीकांत भालेराव, काका खंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारकडून संस्थेला कुठलेच अनुदान न मिळाल्याबद्दल आठवले यांनी आश्चर्य व्यक्त केले. अशाही स्थितीत लोकाश्रयाच्या जोरावर स्नेहालयने उभे केलेले काम समाजाला प्रेरणादायी असे ते म्हणाले. संस्थेच्या संघटक शोभा साळुंके यांनी यावेळी या महिलांचे विविध प्रश्न मांडले.