अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडा खालसा येथील हत्याकांडातील आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने दिघा येथे रविवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दलितांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत असून नुकतीच जवखेडा खालसा हत्याकांडाने अत्याचाराची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटनांना लगाम लागवा यासाठी बहुजन समाजाने एकत्र येऊन एकजुटीने लढायला पाहिजे. या उद्देशाने अत्याचारविरोधी परिषद, आरपीयाअ युवक आघाडी, दिघा यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
जवखेडा हत्याकांडातील आरोपींना राजकीय व पोलीस प्रशासनाचे अभय असल्यामुळे आरोपी मोकाट फिरत असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. तसेच हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. या वेळी आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा शीला बोधडे आदी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader