केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा वर्ग घेतल्यानंतर पुन्हा येत्या रविवारी भाजपसह संघाशी संबंधित विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा एक दिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला असून या वर्गाला मुख्यमंत्र्यांसह संघाचे आणि भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करण्याची असल्याची माहिती आहे.
भाऊराव देवरस प्रतिष्ठानतर्फे रेशिमबागेतील स्मृतीभवन परिसरात या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गाला विदर्भातील संघाशी संबंधित  प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर संघाने यापूर्वी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे अभ्यास वर्ग आयोजित केले होते. त्याला संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. राज्यात सत्ता आल्यानंतर संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भाजपच्या प्रमुख लोकप्रतिनिधींचा वर्ग आयोजित केला होता. मात्र, तो काही कारणांमुळे होऊ शकला नाही. त्यानंतर नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळी एक दिवस राज्यातील भाजपचे मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींनी स्मृती मंदिराला भेट दिली असताना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. गेल्या काही दिवसात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर संघाने वेगवेगळ्या वर्गांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना आणि संघाशी संबंधित विविध संघटनांना मार्गदर्शन सुरू केले आहे.
भाऊराव देवरस प्रतिष्ठानतर्फे आयोजित या एक दिवसीय अभ्यास वर्गाला विदर्भातील २०० ते २५० पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यात भाजपचे आमदार, खासदारांसह पदाधिकारी आणि संघाशी संबंधित विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह राज्यातील नेते अभ्यास वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपुरात असल्यामुळे तेही या वर्गाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपच्या राज्यातील सर्व संघटनमंत्र्यांची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत बैठक आयोजित केली असल्यामुळे त्या बैठकीला विदर्भातील सर्व संघटनमंत्री जाणार असल्याने नागपुरातील या अभ्यास वर्गाला ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली.
या बैठकीबाबत बोलताना भाजपचे पदाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले की, हा अभ्यास वर्ग दरवर्षी घेतला जातो. संघाने किंवा भाजपने हा वर्ग आयोजित केलेला नाही. विविध संघटनांमध्ये काम करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना या अभ्यास वर्गाला आमंत्रित करण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Story img Loader