भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि प. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात आनंद व्यक्त करण्यात आला. संघाचे संस्कार आणि त्यातून राष्ट्रकार्यासाठी  केलेल्या समर्पणातून अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाची सेवा केली असून त्याचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया संघाच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी व्यक्त केली.
अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न सन्मान मिळाल्याबद्दल संघाचे ज्येष्ठ प्रचारक मामा मुठाळ यांनी अभिनंदन करून एका स्वयंसेवकाचा देशाने केलेला हा सन्मान असल्याचे सांगितले. संघाचा संघशिक्षा वर्ग असताना अटलजी वर्गात सहभागी झाले होते. नागपुरात तृतीय संघ शिक्षा वर्ग असताना भोजनाच्यावेळी अन्य स्वयंसेवकांना वाढण्याची जबाबदारी लखनौ विभागाकडे होती. त्यावेळी अटलजींनी स्वत: सगळ्यांना वाढले होते. भाजपचे काम करीत असताना ते संघात येत असत. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक असताना अटलजी नागपुरात आले होते. त्यावेळी मी गुरुजींच्या सेवेत होतो. अटलजी लखनौवरून महालाच्या कार्यालयात आले आणि ते बराच वेळ बाहेर बसले होते. त्यांना गुरुजींची भेट घ्यायची होती. त्यावेळी गुरुजी आजारी होते. मात्र, त्याही परिस्थितीत त्यांनी अटलजींना आत बोलविले आणि त्यांच्याशी चर्चा केली होती आणि बहुत बडा आदमी बनेंगा म्हणून त्यांना आशीर्वाद दिले होते. संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. संघाचे संस्कार असल्यामुळे त्यांनी त्या विचारातून, संस्कारातून राष्ट्रकार्यासाठी काम केले. पंतप्रधान झाल्यावर अटलजी नागपुरात आल्यानंतर त्यांनी स्मृती मंदिराला भेट देऊन गोळवलकर गुरुजींचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी अनेक स्वयंसेवकांशी आणि जुन्या प्रचारकांची चौकशी केली असल्याची आठवण मामा मुठाळ यांनी सांगितली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नारायण तरटे लखनौमध्ये प्रचारक असताना त्यांनीच अटलजींना संघात आणले होते. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय नेते असताना ज्या ज्या वेळी ते नागपुरात येत होते ते संघाच्या कार्यालयात येऊन तरटे यांची भेट घेण्यासाठी येत असत.   
ज्येष्ठ प्रचारक आणि विचारवंत मा. गो. वैद्य म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित केल्यामुळे एका योग्य व्यक्तीची निवड केली आहे. भाजपला आज जे यश मिळाले आहे त्याच्या यशाची पायाभरणी आणि उभारणीमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रकार्यासाठी समर्पित असलेल्या या व्यक्तीला सन्मान मिळाल्याने आनंद झाला आहे. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या कार्यकाळात जे चार-पाच स्वयंसेवक भाजपमध्ये काम करण्यास गेले त्यात अटलजींचा समावेश होता. उत्तम वक्ते, संसदपटू आणि राष्ट्रकार्यासाठी असलेले समर्पण यामुळे त्यांना मिळालेला भारतरत्न सन्मान हा योग्य व्यक्तीला देण्यात आला आहे, असेही वैद्य म्हणाले.
राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, अटलबिहारी वाजपेयी यांचा भारत सरकारने भारतरत्न देऊन केलेला सन्मान देऊन त्यांच्या देशसेवेच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या रोमारोमात देशभक्ती आहे. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रकार्य सन्मान समजून केले आहे.
या सन्मानाने त्यांच्या राजकीय जीवनाला सार्वजानिक मान्यता मिळाली आहे. समितीच्या कार्याशी ते जुळले आहेत. कारगील युद्धाच्यावेळी त्यांना खूप वेदना होत होत्या. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांना निर्णय घेता येत नव्हते याचे दुख होते. अटलजींना भारतरत्न सन्मान मिळाल्याने त्यांचे राष्ट्रसेविका समितीतर्फे अभिनंदन करीत असल्याचे त्या म्हणाल्या.