गडकरी-मोदींचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्ते सरसावले
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावे, यासाठी विदर्भातील मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते दिवसरात्र प्रचार करून मेहनत घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही बाहेर पडले आहेत. संघाच्या या बालेकिल्ल्यात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्यात लढत असल्यामुळे ही लढाई दोन्ही उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. बालपणापासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या नितीन गडकरी यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मेहनत घेत असताना आता स्वयंसेवकही त्यांच्यासाठी सरसावले आहेत.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात घरोघरी जनसंपर्क करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती, विद्याभारती, वनवासी कल्याण आश्रम आदी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते गडकरी यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. एकीकडे भाजपच्या मिरवणुका आणि सभा होत असताना संघाचे स्वयंसेवक मात्र घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने दररोज वस्त्या वस्त्यांमध्ये होत असलेल्या बैठकांमध्ये संघ स्वयंसेवकांना आमंत्रित केले जात असून प्रत्येक स्वयंसेवकांना किमान रोज पंचवीस घरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीत भाजपची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांंसोबत ते गेल्या पंधरा दिवसांपासून जोमाने कामाला लागले आहे. कधीही संघात न जाणाऱ्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांंनी शहरातील विविध भागातील सकाळच्या प्रभात शाखेत जाणे सुरू केले असून स्वयंसेवकांच्या मदतीने वॉर्डातील लोकांशी जनसंपर्क केला जात आहे. राष्ट्रीय सेविका समितीच्या माध्यमातून बैठकी घेऊन भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. वस्त्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून महिलांना संघटित करीत आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्य़ांसह नागपुरात पश्चिम नागपुरात शंकरनगर, देवनगर, शिवाजीनगर, गांधीनगर , रामनगर, प्रतापनगर, दक्षिण नागपुरात रेशिमबाग, हनुमान नगर, पूर्व नागपुरात महाल, नंदनवन, वर्धमाननगर तर मध्य नागपुरात दक्षिणामूर्ती, जागनाथ बुधवारी, बडकस चौक, भालदारपुरा तर उत्तर नागपुरात जरिपटका या भागात संघ स्वयंसेवक उमेदवारांसोबत प्रचाराला लागल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा