राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याने हिंदू संघटनांवार गरळ ओकणारे कें द्रीय गृहमंत्री, मणिशंकर अय्यर व दिग्विजय सिंग यांचा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या वतीने येथील जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी एक निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
या निवेदनात केंद्रीय गृहमंत्र्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी नेहरू, गांधी घराण्यावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोणाच्याही चरणी नतमस्तक होण्याचा सल्ला देऊन त्यांनी आमच्या भावना दुखवू नयेत, असा इशाराही दिला आहे. अनेक वेळा दिग्विजय सिंग, मणिशंकर अय्यर यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करणारे वक्तव्य केले आहे. या संघटनांबाबत गृहमंत्र्यांना अशी शक्यता वाटत असल्यास अजूनही त्यांनी बंदी का घातली नाही, असा प्रश्नही या निवेदनात केला आहे. सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री असून त्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन भारताला पाहिजे असणारा दहशतवादी हाफीज सईद याने पाकिस्तानातून संयुक्त राष्ट्रसंघाजवळ ‘भारताला दहशतवादी राष्ट्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांवर बडबड न करता बंदी आणण्याची हिंमत दाखवावी, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक अ‍ॅड. अभय घुडे, आमदार लखन मलिक, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, भाजपचे जिल्हा सरचिटणीस कैलास जुनघरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा