रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विजयादशमीच्या कार्यक्रमातील भाषणाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून निषेध होत असताना दलित चळवळीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या नागपुरातील आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी मात्र  मौन बाळगले आहे, तर माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदर्शन स्वायत्त संघटना असून थेट प्रक्षेपण करण्यात काही गैर नसल्याचे सांगून दूरदर्शनचे समर्थन केले.
विशेष म्हणजे, हा विजयादशमीचा कार्यक्रम आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा एकाच दिवशी होतो. यामुळे या दोन्ही कार्यक्रमांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. यंदाही हे दोन्ही कार्यक्रम पार पडले, परंतु कधी नव्हे ते यंदा सरकारच्या दूरदर्शन वाहिनीने सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केल्यामुळे काँग्रेस, भाकप आदी पक्षांसह देशभरातील दलित, आंबेडकरी संघटनांनी या प्रक्षेपणाचा निषेध केला. मात्र, जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षावधी दलितबांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेथील दलित, आंबेडकरी संघटनांनी या घटनेला अद्याप कुठल्याही प्रकार विरोध केलेला नाही.
यासंदर्भात काही संघटनांशी चर्चा केली असता दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विविध कार्यक्रमात विविध आंबेडकरी संघटना व्यग्र असल्याने दूरदर्शनवरील हा प्रकार अनेकांना माहिती नसल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी उत्तर नागपुरातील पंचशीलनगरातील दगडफेक आणि त्यानंतर उमटलेले पडसाद, याकडेच सगळ्या आंबेडकरी संघटनांचे लक्ष लागले होते. डॉ. भागवतांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या घटनेविषयी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनचे सचिव डॉ. एस.के. गजभिये म्हणाले, आंबेडकरी संघटना गप्प बसलेल्या नाहीत. यावर चर्चा केली जात आहे. निदर्शने करून उपयोग नाही. संपूर्ण मिडिया त्यांच्याच हातात आहे. शासकीय वाहिन्यांचाच वापर नव्हे, तर पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून संपूर्ण देशाला रा.स्व.संघाला आपल्या हातात घ्यायचे आहे.
दीक्षाभूमीवर जगभरातून लाखो नागरिक येतात. त्याचे साधे वृत्तही वाहिन्यांवर दिले जात नाही. वृत्तपत्रांमधून अत्यल्प प्रसिद्धी दिली जाते. मात्र, एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यक्रमाचे शासकीय वाहिनीवर थेट प्रक्षेपण केले जाते. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. याचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले.
डॉ. भागवतांच्या भाषणाचे दूर्दशनने केलेल्या थेट प्रक्षेपणाचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी समर्थन केले. काँग्रेस आणि माकपच्या विरोधाबद्दल विचारले असता ते म्हणाले, दूरदर्शन स्वायत्त आणि व्यावसायिक संघटना आहे. थेट प्रक्षेपण करण्यात काहीच चूक नाही आणि त्यांच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करीत नाही. आम्ही दूरदर्शनवरील बंदी काढली आहे.