नागपूर जिल्ह्य़ात शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा २७ मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून आतापर्यंतची ही पाचवी मुदत वाढ असल्याने शाळांना वंचित गटातील मुले मिळत नाहीत की शाळा या गटातील मुलांना प्रवेश देऊ इच्छित नाहीत, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक शिक्षणासाठी शाळेच्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखून ठेवून त्यात वंचित व दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांना अशाप्रकारे प्रवेश करायचे आहेत. नागपुरात सुरू असलेल्या ऑनलाईन प्रवेशासाठीची नोंदणी संथ गतीने सुरू असून आतापर्यंत ९ हजार ४०९ अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी केवळ ६ हजार ९८४ अर्जाची छाननी झाली आहे. केवळ २५८ अर्जधारकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हा निधी शिक्षण विभागामार्फत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क म्हणून खासगी शाळांना अदा करण्यात येणार आहे. नागपूर विभागात आरईटीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारी शेवटची मुदत होती. मात्र, गुढीपाडवा आणि रविवारची सुट्टी आल्याने नेहमीप्रमाणे प्रवेश प्रक्रियेला आणखी चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. ही प्रवेश प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिली मुदतवाढ १७ मार्चपर्यंत घ्यायचे होते. त्यास मुदतवाढ देण्यात आली.
राज्यातील शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पालकांना ऑनलाईन प्रवेश करणे सोपे जावे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मदत केंद्रे उभारली आहेत. त्यात ईस्टर्न पॉईंट स्कुल नंदनवन, रमेश चांडक इंग्लिन्श स्कुल महाल, नंदनवनचे गायत्री प्राथमिक शाळा, वर्धमाननगरातील श्रेयस विद्यालय, दिघोरीचे अमित उच्च इंग्रजी शाळा, खामल्याचे एम.के.एच. संचेती स्कुल, श्रद्धानंदपेठेतील न्यू कुर्वेज हायस्कुल, धंतोलीतील दीनानाथ हायस्कुल, त्रिमूर्तीनगरातील यशोदा विद्यालय, नंदनवनमधील ज्ञानविकास शाळा, कळमनामधील जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेंट, वैशालीनगरातील महात्मा फुले कन्या शाळा, कुंदनलाल गुप्ता नगरातील महालक्ष्मी उच्च प्राथमिक शाळा, आसीनगर टेका येथील किदवाई शाळा, पाचपावलीतील ब्लू स्टार कॉन्व्हेंट, सदरमधील अंजुमन प्राथमिक शाळा, ओंकारनगरातील साऊथ पॉईंट स्कुल, कुकडे ले-आऊटमधील न्यू अ‍ॅपोस्टोलिक स्कूल, इंजिनिअर्स इंग्लिश स्कुल, अवधुतनगरमधील वंदे मातरम् स्कुल, बाभुळखेडय़ातील मानवता हायस्कुल, तांडापेठेतील नवशक्ती हायस्कुल, हंसापुरीतील निराला कॉन्व्हेंट, गांधीसागरमधील टाटा पारसी हायस्कुल आणि गांधीसागराजवळची हिंदू मुलींची शाळा याठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rte admission date extended again