ठाणे शहरात सर्वप्रकारच्या नियोजनाचे कसे तीनतेरा वाजले आहेत याचा मोठा नमुना सध्या पूर्व द्रुतगती महामार्गावर पहावयास मिळत आहे. ठाणे शहरातील कानाकोपरा सध्या वाहतूक कोंडीने व्यापला असताना मुंबई, नाशिक महामार्गालगत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) परवाना नूतनीकरणासाठी आलेल्या अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसू लागल्या आहेत. आरटीओ कार्यालय स्थापन करताना अशा वाहनांसाठी स्वतंत्र्य वाहनतळ असणे आवश्यक असते. तसेच परवाना चाचणीसाठीही स्वतंत्र्य मार्गिका करणे आवश्यक आहे. असे असताना कोणत्याही नियोजनाअभावी सुरू करण्यात आलेल्या आरटीओ कार्यालयाची वाहने थेट महामार्गावर मुक्काम थाटू लागल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीचे नवे आगार ठरू लागला आहे.
ठाणे शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असल्याने त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिला नाही. तसेच शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. असे असतानाच आता मुंबई-नाशिक महामार्गावरही वाहतूक कोंडी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या लुईसवाडी परिसरात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय नवे कार्यालय असून त्या ठिकाणी जुन्या कार्यालयापेक्षाही जास्त मोकळी जागा आहे. त्यामुळे वाहनांचे परवाने, परवाने नूतनीकरण, वाहन तपासणी अशा प्रकारची कामे या कार्यालयात सुरू करण्यात आली. पण आरटीओच्या या कामकाजामुळे वाहतूक कोंडी होऊ लागल्याने ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. या कार्यालयामध्ये परवाने नूतनीकरणासाठी येणाऱ्या ट्रकला उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ट्रम्क महामार्गावर उभे करण्यात येत आहेत. मात्र, दिवसेंदिवस या ट्रकच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने महामार्गावर ट्रकच्या दुहेरी लांबच्या लांब रांगा लागत आहे. महामार्गावर अशा प्रकारे अवजड वाहने उभी करणे धोकादायक असते. त्यामुळे या वाहनांवर कारवाई केली जावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक करत आहेत. मात्र, आरटीओ कार्यालयाचे पुरेसे नियोजन नसल्यामुळे ट्रक, टेम्पो, ट्रेलरच्या मोठय़ा रांगा महामार्गावर लागल्या आहेत. यामुळे लुईसवाडीतील सव्र्हिस रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी होऊ लागली असून सायंकाळच्या वेळेत नितीन कंपनी तर तीन हात नाका येथेही वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या प्रकरणी ठाणे शहर वाहतूक शाखेने ट्रम्क चालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली असून दिवसाला ३० ते ३५ ट्रकवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात, ठाणे शहर वाहतूक शाखेने आरटीओला पत्र पाठविले आहे. याच पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या कामकाजात काहीसा बदल केला असून आरटीओ निरीक्षकामार्फत ट्रकची जागेवरच तपासणी करून त्यांना जाण्यास सांगत आहेत. असे असले तरी, महामार्गावरील ट्रकच्या रांगा कमी होताना दिसून येत नसल्याचेच चित्र आहे.
आरटीओ पुरस्कृत वाहनकोंडी
ठाणे शहरात सर्वप्रकारच्या नियोजनाचे कसे तीनतेरा वाजले आहेत याचा मोठा नमुना सध्या पूर्व द्रुतगती
First published on: 25-09-2013 at 08:52 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto fevered traffic jam in thane