लोकल सेवा बंद पडल्यानंतर किंवा अटीतटीच्या प्रसंगांच्या वेळी प्रवाशांना रास्त दरात, समाधानाने सेवा देण्याऐवजी रिक्षा चालक प्रवाशांची लूटमार करीत असल्याचे प्रकरण राज्याच्या परिवहन विभागाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे. डोंबिवलीतील रिक्षा चालकांनी गेल्या आठवडय़ात दिवा येथील घटनेमुळे लोकल सेवा ठप्प झाल्यानंतर प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे दर आकारून सेवा दिली. अनेक रिक्षा चालकांनी प्रवाशांची वाहतूक करण्यास नकार दिला. रिक्षा चालकांच्या या उद्दामगिरीला आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग यांनी डोंबिवलीत संयुक्तपणे रिक्षा तपासणी मोहीम सुरू केली आहे. बुधवारी रात्री वसई-विरारच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी डोंबिवलीत रिक्षांची तपासणी सुरू करताच वाहनतळावरील अनधिकृत रिक्षा चालकांनी प्रवासी न घेताच घरी पळ काढला.
कल्याण-डोंबिवलीतील अनेक रिक्षा चालकांनी रिक्षाचे परमिट नूतनीकरण केलेले नाही. काही रिक्षा पंधरा र्वष होऊनही वापरल्या जात आहेत. अनेक रिक्षा चालक गणवेशात रिक्षेत बसत नाहीत. प्रदूषण नियंत्रणासाठी अनेकांनी ‘पीयूसी’ करून घेतले नाही. कल्याण-डोंबिवलीत नियमित ‘आरटीओ’, वाहतूक विभागाची तपासणी होत नसल्याने रिक्षा चालक अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करतात. ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम सुरू केली की काही राजकीय मंडळी तपासणीमुळे रिक्षा चालक गायब झाले, प्रवाशांची गैरसोय झाली म्हणून तपासणी अधिकाऱ्यांना वेठीस धरतात, असे अनेक वर्षांपासून प्रकार सुरू आहेत.
बुधवारी रात्री ‘आरटीओ’ अधिकारी डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी भागात अचानक रिक्षा तपासणीसाठी आले. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर रिक्षा वाहनतळावरील अनधिकृत रिक्षा चालक रिक्षेसह घरी पळाले. सुमारे २५ रिक्षा चालक गोपीनाथ चौक, महाराष्ट्रनगर, सत्यवान चौक, रेतीबंदर भागातील गल्लीबोळांमध्ये रिक्षा उभे करून लपून बसले असल्याचे दृश्य दिसत होते. गोपीनाथ चौकातून गरिबाचावाडा मार्गे जाणाऱ्या रिक्षा आरटीओ अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडायला नको म्हणून उमेशनगर, महाराष्ट्रनगर भागातून रेल्वे स्थानक भागात नेण्यात येत होत्या. संध्याकाळी सात वाजता रिक्षा वाहनतळांवरून गायब झालेले रिक्षा चालक रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्यासाठी परतले नव्हते. या सगळ्या धावपळीत घरी परतणाऱ्या प्रवाशांची वेळेत रिक्षा न मिळाल्याने तारांबळ उडत होती.

चालकांची ‘शाळा’
रिक्षा तपासणी मोहिमेत आरटीओ अधिकारी रिक्षेची कागदपत्रे, पीयूसी तपासणी करतात. अनेक रिक्षा चालकांकडे ही कागदपत्रे नसल्याने अधिकारी त्या चालकाला नोटीस देऊन सुमारे तीन ते चार हजार रुपये दंड भरण्याची पावती फाडतात. काही रिक्षा चालकांची परमिट जप्त करण्यात येतात. दंड भरण्यासाठी आरटीओ पथक वसईचे असेल तर वसईला जाऊन दंड भरणा करावा लागतो. नवी मुंबई, ठाणे, मुंबई येथील पथके असतील तर तेथे जाऊन दंड भरणा करावा लागतो. हा रिक्षा चालकांचा छळ सुरू आहे, असे अनेक रिक्षा चालक व त्यांच्या नेत्यांनी सांगितले. स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांना चालकांवर कारवाई करताना नेते, संघटना यांचा दबाव येतो. त्यामुळे बाहेरील पथके मागवून डोंबिवलीतील रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा धडाका परिवहन विभागाने लावला आहे.

Story img Loader