वन विभागातील लेखापाल या पदासाठी येथील बी. डी. भालेकर विद्यालयात मंगळवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी साईप्रकाश यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. ही परीक्षा रद्द करण्यात यावी, केंद्रप्रमुख व परीक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
लेखापाल या पदाच्या चार जागांसाठी भालेकर विद्यालयातील केंद्रात एक हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. केंद्रातील वातावरण इतके मुक्त होते की परीक्षेचे कोणतेही दडपण ना विद्यार्थ्यांवर होते ना निरीक्षकांवर. परीक्षेदरम्यान कोणत्याही शासकीय नियमांचे पालन करण्यात आले नाही. एका बाकडय़ावर चार विद्यार्थी बसविणे, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका समान असणे, लग्नात जेवणासाठी वापरावेत त्याप्रमाणे बाकडय़ांची स्थिती असणे, सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचा एकच संच, परीक्षा केंद्रावर भ्रमणध्वनीचा सर्रासपणे वापर, प्रश्नपत्रिकेवर कुठल्याही प्रकारचा प्रश्नपत्रिका क्रमांक नसणे असे सर्वकाही यावेळी आढळून आल्याचे अभाविपने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर दोन तासांची वेळ नमूद करण्यात आली असताना प्रश्नपत्रिकेवर प्रत्यक्षात वेगळीच वेळ देण्यात आली होती. एकाच क्रमांकाचे दोन प्रश्न विचारण्यात आले. ५३ नंबरचे दोन प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नपत्रिका ही एकूण १०१ प्रश्नांची होती. परीक्षा २० मिनिटे उशीर सुरू झाली. आयोगाच्या कोणत्याही नियमाचे पालन करण्यात आले नाही.
एका वर्गात नियमानुसार २५ परीक्षार्थीची मर्यादा आवश्यक असताना येथे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी बसविण्यात आले होते. आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रश्नपत्रिकेच्या मुख्य पृष्ठावर कोणतीच माहिती नव्हती. उदा. प्रश्नपत्रिका क्रमांक, नियमावली इत्यादी. मुलांनी सदर चूक लक्षात आणून दिली असता त्यांना धमकाविण्यात आले व मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
ही परीक्षा रद्द करण्यात यावी व रितसर नियमानुसार पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, परीक्षा केंद्रप्रमुख आणि वन विभागाच्या परीक्षेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, ‘एमकेसीएल’ ला स्पर्धा परीक्षा पद्धतीतून वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपतर्फे देण्यात आला आहे.
वन विभागाच्या परीक्षेत नियमांचे सर्रास उल्लंघन
वन विभागातील लेखापाल या पदासाठी येथील बी. डी. भालेकर विद्यालयात मंगळवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत नियमांचे सर्रासपणे उल्लंघन
First published on: 14-08-2013 at 10:26 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rule breaks in forest department examination