युवक काँग्रेसच्या जडणघडणीत खासदार राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे आवर्जून सांगणारे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव विधिमंडळाच्या कामकाजात मात्र सहभागीच होत नसल्याचे विधिमंडळ संक्षिप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कळमनुरीचे आमदार राजीव सातव केवळ दोन दिवस उपस्थित होते, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील केवळ तीन दिवसच हजेरी लावली. अधिवेशनादरम्यान एवढी अनुपस्थिती का, असा प्रश्न सातव यांना विचारला असता या अधिवेशनात मी निश्चितपणे उपस्थित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. अर्थात, हे सर्व चित्र हिवाळी अधिवेशनाचे असले, तरी विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशनात तरी यात सुधारणा होणार काय, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
मराठवाडय़ातील बहुतांश आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवला आणि त्यांची उपस्थितीही चांगली होती. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची मागील अधिवेशनातील उपस्थिती ३३ टक्के होती. हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी ९ दिवस हजेरी लावली. त्यांची उपस्थिती ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचली. नेहमीप्रमाणे अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांनी १०० टक्के हजेरी लावली.
या अधिवेशनादरम्यान उस्मानाबादचे आमदार ओम राजेनिंबाळकर, रावसाहेब अंतापूरकर, सुधाकर भालेराव, संजय जाधव, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही १० दिवस पूर्ण वेळ कामकाजात सहभाग नोंदविला. सिंचन घोटाळा व मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीवर डिसेंबरच्या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली होती. त्यातही या सदस्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, सत्ताधारी गटातील बहुतांश आमदारांनी काही दिवस दांडय़ा मारणेच पसंत केले.
लातूरचे आमदार अमित देशमुख ४ दिवस गैरहजर होते, तर कन्नडचे हर्षवर्धन जाधव केवळ ३ दिवसच अधिवेशनादरम्यान उपस्थित राहिले. ज्या सत्ताधारी नेत्यांचे नाव मोठे, त्यांनी अधिवेशनादरम्यान दांडय़ा मारल्याचेच चित्र उपस्थिती अहवालावरून दिसून येत आहे. केंद्रातील युवक काँग्रेसच्या कामात व्यस्त असल्याने काही वेळा अनुपस्थित राहावे लागते. मात्र, चालू अधिवेशनात सहभागी झालो असल्याचे आमदार सातव यांनी आवर्जून सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा