समांतर जलवाहिनीचे कंत्राट रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे, ही योजना नव्याने सुरू राहावी, म्हणून मुंबई-दिल्लीतील नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या भेटीगाठी चालू असतानाच विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार किशनचंद तनवाणी यांनी पाण्याच्या गळतीवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. गळती थांबविण्यासाठी गेल्या ४ वर्षांत १७ कोटी ७७ लाख रुपये खर्च झाला. त्यात ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाला असल्याचा संशय तनवाणी यांनी सभागृहात उपस्थित केल्याने महापालिकेतील सत्ताधारी अडचणीत आले आहेत. या प्रश्नाला खैरे व तनवाणी यांच्यातील अंतर्गत कुरबुरीची किनार असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद शहराला १४०० व ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो. शहरांतर्गत टाकलेल्या जलवाहिन्या तुलनेने नवीन असल्या, तरी गळती थांबविण्यावर एवढा खर्च कसा आणि खर्च झाल्यानंतरही एवढय़ा अधिक गळत्या का, असा प्रश्न तनवाणी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ४ वर्षांपासून गळती थांबविण्याच्या नावाखाली अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा संशय तनवाणी यांनी व्यक्त केला.
या अनुषंगाने सभागृहात चर्चा झाली नाही. मात्र, महापालिकेने लिखित स्वरुपात उत्तर दिले असल्याचे तनवाणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नहर-ए-अंबरी, हर्सूल तलाव, जायकवाडी जलाशयातील जुनी योजना व नव्या योजनेतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यातील नहर-ए-अंबरी व हर्सूल तलाव कोरडे असल्याने योजना बंद आहेत. जायकवाडी धरणात अत्यल्प साठा असल्याने पंपाने पाणीउपसा हव्या त्या प्रमाणात होत नाही. जायकवाडीची जुनी योजना १९७५मधील आहे. क्षमताही कमी आहे. जायकवाडीतून १९९२-९३मध्ये नवीन योजना कार्यान्वित झाली. तिच्या देखभालीवर १६ कोटी ३७ लाख खर्च झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे. जलवाहिनीचे आयुष्य संपल्याने वारंवार दुरुस्त्या कराव्या लागतात. १ एप्रिल २०१२ ते १३ मार्च २०१३ या कालावधीत ४ हजार २७३ गळत्या दुरुस्त केल्याचा दावा महापालिकेने केला. लिखित स्वरुपातील या उत्तरावर सभागृहात अद्यापि चर्चा झाली नसली, तरी निमित्ताने समांतर जलवाहिनीचा विषय निघावा, जेणेकरून औरंगाबाद शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न चर्चेत यावा, अशी इच्छा असल्याचे तनवाणी यांनी स्पष्ट केले. राजकीयदृष्टय़ा हा प्रश्न उपस्थित केला नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला असला, तरी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाने शिवसेनेतील अंतर्विरोध मात्र पुढे आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा