मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर सध्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. दररोज ३० ते ४० छोटय़ा मोठय़ा तक्रारी संकेतस्थळाच्या माध्यामातूून येत आहेत. आतापर्यंत या संकेतस्थळांवर ५१ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. या सततच्या तक्रारींमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. यातील अनेक तक्रारी खोटय़ा आणि क्षुल्लक असल्याने पोलिसांना त्यावर ब्रेक लावण्यासाठी तक्रारदारांना आपली ओळख बंधनकारक केली आहे.
  मुंबई पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ २००५ साली सुरू झाले. सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात जाण्यास कचरतात. त्यामुळे तक्रारी थेट आयुक्तांपर्यत पोहोचविण्यासाठी या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु त्यात तक्रारदाराला आपले नाव गुप्त ठेवता येत होते. त्यामुळे सतत छोटय़ा मोठय़ा कारणांच्या आणि बोगस तक्रारी येत होत्या. आतापर्यंत ५१ हजारांहून अधिक तक्रारी या संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलिसांकडे आल्या आहेत. त्यामुळे गेल्या शनिवारपासून नव्याने तयार झालेल्या संकेतस्थळावर पोलिसांनी तक्रारदाराला आपले नाव देणे बंधनकारक केले आहे.
यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींमध्ये क्षुल्लक तक्रारीच अधिक असतात. इतरांना त्रास देण्याच्या उद्देशानेही तक्रारी केल्या जातात. बॉम्ब ठेवला असल्याच्या खोटय़ा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या तक्रारी सायबरसेलकडून मग संबंधित पोलीस ठाण्यात पाठविल्या जातात. परंतु त्यांची शहानिशा केल्यावर त्या बोगस किंवा महत्त्वाच्या नसल्याचे आढळून येत होते. याशिवाय बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्याने आपली ओळख देणे (उदा नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक) बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे खोटय़ा तक्रारींना आळा बसू शकेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नि:शंकपणे पुढे येण्याचे आवाहन
पोलिसांचे संकेतस्थळ हे नागरिकांच्या सोयीसाठी आहे. जनतेने खऱ्या तक्रारी निर्भयतेने कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात पाठवल्या जातात. त्या संबंधित पोलीस ठाण्यांना तीन दिवसांच्या आत त्या तक्रारींवर काय कारवाई केली त्याचा अहवाल पाठवावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळेल असे पोलिसांनी सांगितले.
नवीन स्वरूपात आले संकेतस्थळ
गेल्या ७ वर्षांपासून मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ खासगी सव्‍‌र्हरवर होते. राज्य सरकारच्या सव्‍‌र्हरवर आणून ते विकसित करण्यासाठी पोलिसांकडे निधी नव्हता. अखेर एका खासगी विकासकाने मदतीचा हात पुढे केल्याने मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ नव्या रूपात राज्य सरकारच्या सव्‍‌र्हरवर आले आहे. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. अटक केलेल्या आरोपींपासून, हरविलेल्या व्यक्ती, पोलीस ठाण्यांचे क्रमांक, दैनंदिन गुन्हेगारीच्या घडामोडी, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक आदी माहिती असल्याने संकेतस्थळाला भेट देण्याऱ्यांची संख्याही वाढत आहे. सध्या दररोज २ ते अडीच हजार जण या संकेतस्थळाला भेट देत असतात.
पाकिस्तानातून हॅक करण्याचा प्रयत्न
मुंबई पोलिसांची बेवसाइट हॅक होऊ नये यासाठी पोलिसांनी आता अधिक सुरक्षित उपाययोजना केल्या आहेत. २००८ साली हे संकेतस्थळ एकाच आठवडय़ात तीन वेळा हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पाकिस्तानातील हॅकर्सनी हा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या आधारे हे संकेतस्थळ अधिक सुरक्षित करण्यात आल्याचे सायबर सेलच्या पोलिसांनी सांगितले.

Story img Loader