जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी पक्षातच खडाजंगी बघावयास मिळाली. दलित वस्ती सुधार योजनेच्या याद्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यात काम वाटपावरून चांगलीच जुंपली. त्यातच काम वाटप याद्यावरून विरोधकांनी घूमजाव केल्याने आजच्या सभेत गरमागरमी बघावयास मिळाली.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर होते. सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा परिषद सभापती मोरेश्वर कटरे, कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. िशदे उपस्थित होते. अनेक सभेत गाजत असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या तयार याद्यांचा मुद्दा या सभेतही चांगलाच गाजला. विशेष बाब म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवणकर यांनी काही सदस्यांनी आपल्या क्षेत्रात वाजवीपेक्षा जास्तीचा निधी पळवून नेल्याचा आरोप करताच, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल चांगलेच भडकले व त्यांनी हे आरोप चुकीचे असून नियमानुसारच आपल्या क्षेत्रात दिलेल्या प्रस्तावानुसार काम वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे मात्र सत्ताधारीच आपसात आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे चित्र सभागृहात निर्माण झाले. शिवाय, यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या तयार याद्यांवरून विरोधकांनीही या याद्या रद्द करून नव्याने याद्या तयार करून जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय काम वाटप करण्यात यावे, अशी भूमिका यापूर्वीच्या सभेत मांडली जात होती.
परंतु, आजच्या सभेत विरोधकांनाही याद्यावरून घूमजाव केल्याने पूर्वीच्या तयार याद्यानुसार काम करण्याला मंजुरीच असल्याचा देखावा निर्माण झाल्याने  प्रकरण यापुढेही चच्रेत राहणार असल्याचे दिसते. त्यातच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व पंचायत विभागात समन्वय नसल्यामुळे जिल्ह्यात सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेच्या अंमलबजावणीसाठी आलेला १६८.२१ लाखाचा निधी तसाच पडून असल्याचा मुद्दाही चच्रेत आला. त्यावर उत्तर देणाऱ्या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसून आला. यावेळी अध्यक्षांनी दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देऊन हा निधी समन्वय साधून खर्च करण्याचे निर्देश दिले. काही दिवसांपासून चच्रेत असलेल्या रासायनिक खताचा मुद्दाही सभेत चच्रेला आला. या मुद्यावरूनच कृषी विभागाने तयार केलेल्या भरारी पथकाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढण्यात आले. दरम्यान, कृषी सभापती व अधिकाऱ्यांनी यापुढे सूचविलेल्या निर्देशानुसार भरारी पथक काम करणार असल्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे विविध विषयांवर सभा गाजली असली तरी सत्ताधाऱ्यातीलच दोन प्रमुख सदस्यात खडाजंगी आजच्या सभेचे वैशिष्टय़ राहिले.

Story img Loader