महापालिकेत दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजप-सेना युतीने आणि नंतर तीन वर्ष सत्तेत असलेल्या भाजप-मनसे युतीने कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. विकास कामांविषयी घोर निराशा केल्याची टीका डावी आघाडी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. डी. एल. कराड यांनी केली. शहरातील नरहरी नगरात आयोजित संवाद सभेत ते बोलत होते.
पालिकेला कर्जबाजारी केले. एकही विकास योजना व्यवस्थित राबविली नाही. सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब, घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, बंद पथदीप अशा समस्यांना नाशिककरांना सामोरे जावे लागत आहे. घोटाळा करून सत्ताधाऱ्यांनी घरकुल योजना मोडीत काढली. पावसाळी गटारी योजनेत भ्रष्टाचार केला. पेलिकन पार्कचा प्रश्न सोडविण्यास अपयश आले. फाळके स्मारकाचे सौंदर्य गेले. शहरासाठी आवश्यक विकासाच्या कागदपत्रांवर सत्ताधारी आयुक्तांची स्वाक्षरी घेऊ शकत नसल्याने शहराचा विकास खुंटला असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले. त्यामुळे नाशिककरांची निराशा झाली असल्याचे डॉ. कराड यांनी यावेली सांगितले.