कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास विरोध करून कराड व पाटण तालुक्यातील विकासाला खीळ घालण्याचे काम सत्ताधारी पक्षातीलच आमदार व कार्यकर्ते करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील यांनी पत्रकाद्वारे केला.
पत्रकात म्हटले आहे, की कराड विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्रातील सन १९५६ मध्ये झालेले एकमेव विमानतळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा विचार करूनच ते तयार केले. त्यामुळे परिसराचा मोठा विकास झाला. मात्र, दुर्दैवाने राजकारणातील विरोधासाठी विरोध म्हणून विमानतळाच्या विस्तारीकरणास विरोध होत आहे. त्यांना भावी पिढी कदापि माफ करणार नाही. कारण कराड हे मध्यवर्ती ठिकाण असून, कोकण आणि दुष्काळी भाग जोडणारे केंद्रबिंदू व प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. शेतीवरील उद्योगाचे मोठे सेंटर आहे. या विमानतळामुळे कराड, पाटण, चिपळूण, कडेगाव, शिराळा, विटा, शामगाव, इस्लामपूर, वाळवा या परिसरासह जिल्ह्यातील पुसेसावळी, उंब्रज सातारा आदी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. विस्तारीकरणामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाने बाजारभावापेक्षा दहापट जादा दराने भरपाई द्यावी, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीची हमी, भैरवनाथ पाणी संस्थेचे शासकीय खर्चातून पूर्णत: पुनरुज्जीवन, धावपट्टीसाठी आवश्यक तेवढीच कोरडवाहू व बागायत जमीन संपादित करावी, जेणेकरून शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान व्हावे याची शासनाने दखल घ्यावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या असून, शासन त्या निश्चितपणे पूर्ण करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कराड येथे होणारे भूकंप संशोधन केंद्र तसेच कोकण रेल्वेला जोडण्यासाठी होणारे जंक्शन, कोकणातील जयगड पोर्ट व कडेपूर, कडेगाव, पुसेगाव आदी विभागांत भविष्यात येणाऱ्या मोठय़ा अवजड उद्योगांसाठी विमानतळाची अत्यंत गरज आहे. कराड हे राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे व विमानसेवेने जोडणारे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे विस्तारीकरणासाठी विरोध न करता भविष्याचा विचार करावा असे आवाहन अॅड. भरत पाटील यांनी केले आहे.