मुख्याधिकारी उपस्थित नसल्याच्या कारणावरून विरोधी जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सोमवारी नगरपालिकेत सभात्याग केला. ही सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याने यासंदर्भात जिल्हाधिकारी व वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही विरोधकांनी दिला.
मागील सभेत सत्तारूढ गटाचा एक नगरसेवक गैरहजर असल्याचा लाभ उठवून जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सर्व विषय नामंजूर केले होते. या पाश्र्वभूमीवर नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा घेण्यात आली. विरोधकांनी मुख्याधिकारी या सभेस उपस्थित नसल्याच्या कारणावरून सभात्याग केला. गेल्या दोन महिन्यांपासून नगरपरिषदेत मुख्याधिका-यांची जागा रिक्त आहे. यामुळे मुख्याधिका-यांचा अतिरिक्त कार्यभार नायब तहसीलदार पाठक पाहतात. परंतु ते आज उपस्थित नव्हते. यामुळे विरोधी गटाचे नगरसेवक दिनार कुदळे, संजय जगताप, कृष्णा आढाव, ऐश्वर्या सातभाई, वैशाली आढाव, मायादेवी खरे, राजेंद्र झावरे यांनी सभात्याग केला.
यानंतर विरोधकांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले. यामध्ये मागील सभेत नामंजूर झालेले शहरातील महत्त्वाच्या ४ रस्त्यांच्या २ कोटी ५० लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये शहरातील घनकचरा उचलणे व विल्हेवाट लावणा-या ठेक्याचा समावेश आहे, तर कोपरगाव तालुका विद्यार्थी साहाय्य समितीच्या जागावापरास वाढीव मुदत देण्यासंदर्भातील अर्ज शहरात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना सन २०१३ अंतर्गत एक नवीन रुग्णालय उभारणीस जागा ही जागा मिळावी याकरिता नामंजूर करण्यात आला.
सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांशी बोलताना सत्तारूढ गटाचे गटनेते राजेंद्र सोनवणे व नयनकुमार वाणी यांनी शहरातील विकास कामांची माहिती देऊन विरोधकांनी राजकीय आकस मनात न ठेवता शहर विकास कामाला सहकार्य करावे अशी मागणी केली.
तर दुसरीकडे विरोधी गटनेते डॉ. अजय गर्जे, अतुल काळे, संजय सातभाई, दिनार कुदळे यांनी तहसीलदार राहुल जाधव यांना नगरपरिषदेत बोलावून घेतले. परंतु तोपर्यंत सर्वसाधारण सभेचे कामकाज संपले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी अथवा शासन प्रतिनिधींअभावी झालेली ही सभा बेकायदेशीर असून, तहसीलदारांना व नगराध्यक्षांना लेखी निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा