नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात शनिवारी संध्याकाळी कळंबोली पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती देणाऱ्या आलेल्या निनावी दूरध्वनीमुळे पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली होती. यानंतर तातडीने कळंबोली पोलीस ठाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने खाली करण्यात आले होते. तब्बल दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाल्यावर यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. दूरध्वनी करून बॉम्बची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी अमोल पवार या माथाडी कामगाराला अटक केली आहे.  
नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने याबाबत कळंबोली पोलीस ठाण्याला सायंकाळी चार वाजता माहिती दिल्यानंतर संपूर्ण पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांच्या आदेशानंतर रिकामी करण्यात आले. श्वान पथक, बॉम्बशोध पथकाकडून तब्बल दोन तास शोधमोहीम सुरू होती, मात्र कोठेही काहीही आढळून न आल्याने हा दूरध्वनी दिशाभूल करण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. नियंत्रण कक्षाला ज्या मोबाइलवरून कॉल आला त्याच्याआधारे शोध घेत अमोल पवार याला रात्री आठ वाजता अटक करण्यात आली.
अमोल हा माथाडी कामगार आहे. कळंबोलीजवळच्या लोखंड बाजारात तो नवी टोळीमध्ये कामाला आहे. अमोलने गेल्या महिन्याभरापासून त्याच्या एका मित्राचे मोबाइलचे कार्ड स्वत:जवळ ठेवले होते. अमोलने यापूर्वी दोन महिलांनाही मोबाइलवर फोन करून त्रास दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
ज्या मित्राचे मोबाइलचे सिमकार्ड अमोलने घेतले होते, त्या मित्राच्या पत्नीलाही अमोल फोन करून त्रास देत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अमोलवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.  

Story img Loader