अनधिकृत अभिन्यासांमध्ये विकास शुल्क सरसकट दुप्पट आकारण्यात येणार असल्याबाबत काही लोक अपप्रचार करत आहेत, असा आरोप रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरातील १९११ अनधिकृत अभिन्यास गुंठेवारी नियमांतर्गत नियमित करण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात जाहीर केला होता. यासाठी दुप्पट विकास शुल्क आकारण्याच्या निर्णयावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, फक्त हरित पट्टय़ांतर्गत असलेल्या ५७६ लेआऊट्समध्ये सध्याचे ५० रुपये हे विकास शुल्क वाढवून १०० रुपये करण्यात आले आहे. या भागात रस्ते, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण यासारख्या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी १६२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्यामुळे हे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि सर्वच भूखंडांवर दीडशे रुपये शुल्क लागेल असे सांगून काही लोक नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
उर्वरित १३३५ अभिन्यासांमध्ये सध्याच्या ५० रुपये या दरानेच विकास शुल्क घेण्यात येईल. पूर्वीचे १६ रुपये शुल्क वाढवून ५० रुपये शुल्क करण्याचा निर्णय १० मे २०१२ रोजीच घेण्यात आला होता व त्यानुसार अनेक लोकांनी नागपूर सुधार प्रन्यासकडे पैसे भरलेले आहेत.
या अनधिकृत लेआऊट्सचा विकास झाल्यामुळे तेथे बँकांकडून कर्ज मिळणे आणि भूखंडांची खरेदी-विक्री होणे सोपे होईल. भूखंडधारकांकडून वसूल होणारे विकास शुल्क सुविधांसाठी पुरेसे नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सोयींसाठी किती निधी लागेल याची माहिती पाठवण्याचे निर्देश दिले असून, निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे, असे राऊत म्हणाले.
शॉपिंग फ्रंटेज आणि रहिवासी पट्टे  याबाबतचे निर्णय तांत्रिक बाबींमुळे रखडले असून ते लवकरच घेतले जातील. हरित पट्टय़ांतर्गतच्या ५७६ लेआऊट्सपैकी २०५, तर छोटी आरक्षणे असलेल्या ११९२ पैकी २४६ उत्तर नागपुरात असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
योग्य नियोजनाअभावी शहराचा विकास रखडला असल्याचा आरोपही नितीन राऊत यांनी केला. महापालिकेला मिळालेला ‘बेस्ट सिटी’ चा पुरस्कार शहरातील खड्डय़ांबाबत मिळाला की अनियमित पाणीपुरवठय़ाबाबत हे सांगता येत नसल्याचे ते उपहासाने               म्हणाले.
छोटय़ा राज्यांमुळे नक्षलवाद वाढतो हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे तुम्हाला मान्य आहे काय, या प्रश्नाचे त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. देवडिया भवनात झालेली हाणामारीची घटना निंदनीय असून, काँग्रेसच्या कुणाही कार्यकर्त्यांने असे करण्याचे समर्थन करता येत नाही, असे नितीन राऊत यांचे म्हणणे होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता हेही यावेळी हजर होते.

Story img Loader