*‘‘दहा मिनिटांपूर्वी मुंबईतील गजबजलेल्या परिसरात एक प्रवासी विमान कोसळले आहे. ही घटना खूप धक्कादायक आहे. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा.’’ *‘रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार तुम्ही जर तुमच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेच्या ‘एटीएम’मधून पसे काढलेत तर तुम्हाला ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.’’
वरील दोन्ही संदेश तुम्हाला परिचयाचे वाटले असतील. एकदा तरी तुम्ही हे संदेश वाचून फसला असालच. सध्या ‘व्हॉट्सअप’वरून अशा प्रकराचे अनेक अफवा पसरविणारे आणि भीती निर्माण करणारे संदेश फिरू लागले आहेत. यामुळे अनेकदा लोक फसतात, तर अनेकदा भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा संदेशांना रोखणे खरोखरच पोलिसांच्या दृष्टीनेही एक आव्हान बनले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे सोपे असल्यामुळे अल्पावधीतच याची लोकप्रियता वाढली, पण याचा वापर आता अफवा पसरविण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. सायबर क्राइम विभागासमोरही त्यामुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे हे सध्याच्या तरुणांचे नवीन उद्योग अनेकदा समाजात अशांतता पसरविण्याचे काम करत असतात. विशेषत: दंगल, बॉम्बस्फोट अशा वेळी या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या या गोष्टी आता ‘व्हॉट्सअप’सारख्या मेसेजिंग सेवांच्या माध्यमातूनही पसरू लागले आहेत. मुझफ्फरपूर येथे नुकत्याच झालेल्या दंगलीच्या दरम्यान सोशल मीडियाचा वापर करून अफवा पसरविण्याचे काम नित्याने सुरू होते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी ट्रॅक ठेवला व पाच जणांना अटक केले. पण अशा घटनांच्या वेळी सजग असलेले पोलीस ही कारवाई करतात, पण इतर वेळी येणाऱ्या अफवांबाबत असा ट्रॅक ठेवणे अवघड असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोणतीही घटना घडली की त्या वेळी पसरणाऱ्या अफवांचे प्रमाण हे खूप जास्त असते व ते एकाकडून अनेक ठिकाणी सातत्याने पुढे फिरत असतो. यामुळे त्याचा ट्रॅक ठेवणे सोपे जाते. पण इतर वेळी हा ट्रॅक ठेवणे अवघड असल्याचे सायबर सेलमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. समाजात केवळ भीती पसरविणे आणि लोकांची फसवणूक करणे ही अशा लोकांची मानसिकता असते. यातूनच असे संदेश तयार होत असतात असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दंगली किंवा इतर घटनांवेळी समाज विघातक संघटना अशा प्रकारच्या अफवा पसरवत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होते, असे अधिकारी सांगतात.
परदेशांमध्येही अशा घटना सातत्याने होत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी सक्षम माहिती तंत्रज्ञान धोरण असणे ही गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अफवांचा त्रास आपल्यालाच होतो असे नाही, तर खुद्द ‘व्हॉट्सअप’लाही होतो. मध्यंतरी ‘व्हॉट्सअप’ गुगल विकत घेणार अशी अफवा जोरदार पसरली होती, यामुळे ‘व्हॉट्सअप’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. येत्या काळात पोलिसांसाठी असे संदेश मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.

Story img Loader