एकीकडे समुद्रकिनारी भरतीच्या उंच लाटा अंगावर घेत आनंदाने उधाणलेले काही तर दुसरीकडे कुंद वातावरणात ढगफुटीच्या अफवांनी दुपारीच कार्यालयातून घराकडे धाव घेतलेले काही.. गुरुवारी मुंबईकरांनी या दोन्ही टोकांचा अनुभव घेतला. सोशल नेटवर्किंग साइटमुळे सोसाटय़ाच्या वाऱ्यापेक्षाही अफवा अधिक जोरात फिरत असल्याने स्पष्टीकरण देता-देता सरकारी संस्थांच्याही नाकीनऊ आले होते.
फारा दिवसांनी ‘फुल फॉर्म’मध्ये आलेल्या पावसाने एकीकडे आनंदाचे तर दुसरीकडे भयकंपाचे वातावरण तयार केले होते. सोसाटय़ाचा वारा, पावसाच्या जोरदार सरी आणि दुपारी समुद्राला असलेली ४ मीटरहून अधिक उंचीची भरती, या सगळ्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईच्या किनाऱ्यांवर हजारोंची गर्दी झाली होती. रिमझिमणाऱ्या पावसात वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत आपल्या प्रिय माणसांसोबत जिवाचा पाऊस करणाऱ्यांनी चौपाटी फुलली होती. महाविद्यालयातील तासाला काट मारून तरुणाईही रस्त्यांवर उतरली होती. एकीकडे पावसात रेंगाळणारी पावले दिसत होती तर दुसरीकडे झपाटय़ाने रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारी पावले होती.
‘२६ जुलै’च्या महापुराच्या आठवणी अजूनही पुसल्या गेल्या नसताना गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने गुवारी भीतीचे वातावरण तयार केले. ठाण्यात पावसाने उडवलेला हाहाकार, पुण्यात माळीण गावावर पडलेली दरड यामुळे आधीच भयग्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये ढगफुटीबाबत मिळत असलेल्या व्हॉट्सअपवरील संदेशांनी गोंधळ निर्माण झाला. मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा वेधशाळेचा अंदाज होता. मात्र गुजरात तसेच राज्यातील काही शहरांत ढगफुटी होत असल्याचे संदेश फिरू लागले. अहमदाबाद, सूरत, बडोद्यासह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे २४ तासांत आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस पडणार असल्याचे संदेश मोबाइलवर दिसू लागले. इतरांना सावध करण्यासाठी हा संदेश क्षणार्धात फॉरवर्ड केला जात होता. काहींनी या संदेशामागील सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला, वेधशाळेकडे आणि पोलिसांकडेही संपर्क साधणे सुरू केले. मात्र दुपारी पालिकेकडून वृत्ताचा खुलासा येईपर्यंत अनेकांनी कार्यालये सोडून घराकडे धाव घेतलीही होती. त्यामुळे किनाऱ्यावरील गर्दीप्रमाणेच भर दुपारी रेल्वे स्थानकेही प्रवाशांनी गजबजली. फक्त एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे भय!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा