गॅस सिलिंडरधारकांच्या बँकेतील खात्यात थेट अनुदानित रक्कम जमा करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ही अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी १२५ बँकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील अर्थकारणाचे महत्त्वाचे अंग असणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश नसल्याने येथील सिलिंडर अनुदानाचा लाभार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सिलिंडरधारकाने गॅस एजन्सीत तसेच बँकेत अनुदानित रक्कम मिळण्यासाठी अर्ज दिला की केंद्र सरकारकडून सिलिंडरची ४३५ रुपयांची अनुदानित रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. पेट्रोलियम मंत्रालयाने यासाठी राष्ट्रीयीकृत, नागरी सहकारी, शेडय़ुल्ड बँकांची निवड केली आहे. या १२५ बँकांच्या यादीत ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांसह ग्रामीण भागात सुमारे शंभराहून अधिक शाखा असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश नाही.
ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, पालघर, शहापूर, मुरबाड या ग्रामीण भागांत काही लाखांच्या घरात सिलिंडरधारक आहेत. यातील बहुतांश नागरिक मध्यवर्ती बँकेचे सभासद आहेत.
हे सर्व या अनुदानापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकेच्या तसेच नागरी सहकारी बँकांच्या शाखा फारशा नाहीत. ग्रामीण भागांतील बहुतांश व्यवहार गावांच्या ठिकाणी असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केले जातात, असे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक शिर्के यांनी सांगितले.
अनुदानित रक्कम मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रथम तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागेल. प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खाते उघडणे शक्य होणार नाही. खाते उघडल्यानंतर अनुदानित रकमेसाठी बँकेच्या सही-शिक्क्यांसाठी हेलपाटे मारावे लागतात. हे ग्रामीण भागातील प्रत्येक खातेदाराला शक्य नाही. रक्कम काढण्यासाठी पुन्हा दर महिन्याला तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकेत जाणार कोण, असा सवाल शिर्के यांनी उपस्थित केला. याबाबत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाऊ कु ऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या यादीत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव नसणे योग्य नाही, असे सांगितले. याविषयी पेट्रोलियम मंत्रालयाशी संपर्क करण्यात येईल. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांच्या खात्यात सिलिंडरचे अनुदान जमा करण्याची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यादीतील बँका
* ठाणे जनता सहकारी बँक
* ठाणे भारत सहकारी बँक
* डोंबिवली नागरी सहकारी बँक
* कल्याण जनता सहकारी बँक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा