ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना समाजवादी नेते व पुरोगामी विचारवंत पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात स्वातंत्र्यसेनानी व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी दिली.
लोकशाही व संसदीय जीवनातील उच्च परंपरा आदर्श समाजापुढे सतत रहावा यासाठी माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असे आहे. लिमये यांची कन्या शोभा नेर्लीकर व जावई डॉ. विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्स्कारर्थीची निवड त्याने केलेल्या विधायक कार्यावर होते. यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येते. पुरस्काराचे हे ११ वे वर्ष असून या आधी बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडु गावीत, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सा. रे. पाटील व भाऊसाहेब फुंडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या निवड समितीमध्ये आ. हेमंत टकले, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, नेर्लीकर दाम्पत्य आणि प्रा. विलास औरंगाबादकर यांचा समावेश होता.
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची सर्वानी एकमताने निवड केली. पाटील हे २०-२५ वर्षांच्या कार्यकाळात पाच वेळा एकाच मतदार संघातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. या माध्यमातून त्यांनी आपल्या जिल्ह्याचा कायापालट केला. शिवाय राज्यस्तरावर कार्यक्षम मंत्री म्हणून स्वतंत्र ठसा उमटविला आहे. शिक्षण, सहकार व सुधारणांसाठी त्यांनी प्रयत्न केले. आधुनिक व फायदेशीर शेतीतील सुधारणा हा त्यांचा आवडीचा विषय आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा