जेथे ग्रामराज्य तेथेच रामराज्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी केले. देशातील महिला आज सुरक्षित नाही. सरकारने कायदे केले, पण ते तेवढे पुरेसे नाहीत. त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड असली पाहिजे. जनतेत प्रबोधन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी (पुणे) व भारत अस्मिता फौंडेशन यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात नायडू बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. आमदार पंकजा पालवे, पंडित वसंतराव गाडगीळ, माजी खासदार गोपाळराव पाटील, माईर्सचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, रमेशअप्पा कराड उपस्थित होते. कृषिरत्न, समाजरत्न, आरोग्यरत्न, शिक्षणरत्न, क्रीडारत्न, ग्रामरत्न, बचतगटरत्न, जनजागरण रत्न, अध्यात्मरत्न या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रत्येकी ११ हजार रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पदक, ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
नायडू म्हणाले की, एमआयटीने संपूर्ण आशिया खंडात एकमेव राजकारणाचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू केले आहे. सुशिक्षित युवक-युवतींनी राजकारणात आले पाहिजे. तसे झाल्यास राजकारणाचा दर्जा उंचावेल. या पुढील काळात महिलांवर अत्याचारासारख्या घटना घडणार नाहीत या साठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था हे ज्ञानाचे व सरस्वतीचे मंदिरच आहे. म्हणून येथे येताना मी माझा पक्ष व राजकारण बाहेर ठेवूनच आलो आहे. आता जेव्हा येथून मी बाहेर पडेन तेव्हा त्या गोष्टी परत बरोबर घेऊन जाईन, असे ते म्हणाले.
आमदार पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या की, अटलबिहारी बाजपेयी म्हणतात त्याप्रमाणे पराभूत मन घेऊन कोणीही विजयी होऊ शकत नाही. युवावर्गाने राजकारणात यावे हेही तेवढेच खरे. पण त्यातही महिलावर्गाने अधिक पुढे आले पाहिजे तरच महिलांवरील अत्याचार थांबतील. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी, देशात नेते बरेच आहेत. राष्ट्रपुरुष मात्र कोणी दिसत नाही. युवा पिढीत मद्यपानासारखी व्यसने वाढत आहेत, ही मोठी चिंतेची बाब आहे. व्यसनाधीनतेमुळे त्यांचे चारित्र्य भ्रष्ट होत जाते. ज्या देशातील तरुण भ्रष्ट चारित्र्याचे असतील त्या देशाचा विनाश ठरलेला असतो, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले.

Story img Loader