मतदानासाठी निघालेल्या मतदारांना मतदान केंद्रापासून २०० मीटर बाहेर गाठून सौजन्याने मतदान कक्ष, मतदार क्रमांक उपलब्ध करून आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मंगळवारी धावपळ उडाली. या कामासाठी सौजन्यपूर्ण संवाद साधणारे कार्यकर्ते, स्थानिक युवकांची निवड करण्यावर सर्वच पक्षांचा भर होता. मग त्यासाठी दामदुपटीने पैसे मोजण्यातही उमेदवार मागेपुढे पाहत नव्हते. मतदान केंद्राबाहेरील एका टेबलासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचे ‘पॅकेज’च दिले जात होते. तर काही ठिकाणी एका टेबलासाठी चार जणांना मिळून दोन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जात होती. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या दिवसभरातील खानपानासाठी कॅटर्सना सज्ज करण्यात येत होते.
प्रचार थंडावल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून विश्वासू माणसांची नियुक्ती करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली होती. त्याचबरोबर काही समर्थक आणि कार्यकर्त्यांचा ताफा आपल्याबरोबर राहावा याचीही उमेदवार काळजी घेत होते. मतदानाच्या दिवशी आपल्या फौजेत कार्यकर्त्यांची पुरेशी कुमक असावी यासाठी ओळखीपाळखीच्या सर्वानाच उमेदवार आवतान पाठवत होते.
मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना वाटेतच रोखून त्यांचा मतदार क्रमांक, मतदान कक्ष याविषयी माहिती देऊन त्यांचे मत आपल्याकडे वळविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून मोक्याच्या ठिकाणी टेबल उपलब्ध करण्याचा खटाटोप उमेदवारांनी मंगळवारी चालविला होता. काही मतदान केंद्राकडे जाण्याच्या अनेक वाटा असल्याने अशा ठिकाणी जादा टेबल लावण्याची गरज असली तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळत नसल्याने उमेदवार चिंतातुर दिसत होते. मतदार मोठय़ा संख्येने येणाऱ्या रस्त्यावरच टेबल उपलब्ध करून उमेदवारांनी या प्रश्नावरही तोडगा काढला. मतदार क्रमांक, मतदान कक्ष समजून घेण्यासाठी, येणाऱ्या मतदारांशी सौजन्याने बोलणारे कार्यकर्ते आणि स्थानिक तरुणांचा शोध उमेदवार घेत होते. मतदार दुखावू नयेत यासाठी मिठ्ठास बोलणारे कार्यकर्ते आणि रहिवाशांमध्ये परिचित असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना या कामासाठी पसंती दिली जात होती. अशा व्यक्तींमुळे शेवटच्या क्षणीही मतदाराला आपल्याकडे वळविता येईल हा चलाख विचार त्यामागे होता.
मतदान केंद्राबाहेरील एका टेबलवर मतदारांच्या चार फाईल्स ठेवण्यात येणार आहेत. या टेबलवर तीन-चार तरुणांचा गट सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आळीपाळीने तैनात राहणार आहे. या गटाला काही पक्ष दोन हजार, तर काही पक्ष सहा हजार रुपयांची बिदागी देत आहे. एका टेबलवरील तरुणांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारी चहा-नाश्ता आणि पुरेसे बाटलीबंद पाणी देण्यात येणार आहे. दुपारच्या भोजनामध्ये बिर्याणी, पुरीभाजीचा बेत आखण्यात आला आहे. त्यातही मांसाहारींसाठी चिकन बिर्याणी आणि शाकाहारींसाठी व्हेज बिर्याणी वा पुलावची ऑर्डर स्थानिक बल्लावाचार्याकडे देण्यात आल्या आहेत.
खाद्यापदार्थाची पाकिटे, पाणी आणि इतर ‘साधनसामुग्री’ मतदारसंघातील सर्व केंद्रांवरील टेबलांवर वेळेत पोहोचती व्हावीत यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र फौज वाहनांच्या ताफ्यासह सज्ज ठेवण्यात आली आहे.
अनेकदा नाश्ता, जेवण वेळेवर पोहोचत नसल्यामुळे टेबलवरील मंडळी नाराज होतात आणि त्याचा फटका उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे हा अपघात टाळण्यासाठी काही उमेदवारांनी एका टेबलसाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचे पॅकेजच देऊ केले आहे. टेबलवर किती व्यक्तींनी बसायचे, त्यांचा नाश्ता, जेवण आदींचा खर्च या पॅकेजमधून त्याच व्यक्तींना करावा लागणार आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याची गर्जना करणाऱ्या काही राजकीय पक्षांना काही विभागांत कार्यकर्ते अथवा विश्वासू तरुण मिळत नसल्याने काही उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला आहे. परिणामी त्यांना दामदुपटीने पैसे मोजावे लागत आहेत.

Story img Loader