विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात उद्या, शनिवारी कार्तिकी एकादशीनिमित्त विदर्भ आणि मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठय़ा प्रमाणात वारकरी आणि दर्शनार्थी येणार असून यासाठी प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे. शहरातील विविध विठ्ठल मंदिरात भजन पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक एकादशीला नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतून अनेक दिंडय़ा विठ्ठलनामाचा जयघोष करीत धापेवाडय़ामध्ये येतात. आषाढ वद्य प्रतिपदा व कार्तिक वद्य प्रतिपदाला धापेवाडय़ामध्ये उत्सव साजरा होत असून विदर्भ व मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात वारकरी दर्शनासाठी येतात. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात पुष्पहार व प्रसादाची दुकाने थाटण्यात आली आहेत. वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था कोलबास्वामी मठ मंदिर परिसरात करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंपरागत एकादशीला चंद्रभागेच्या तीरावरील विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी होऊ नये, याकरिता ग्रामपंचायत, विश्वस्त मंडळ व गावकरी मोठय़ा प्रमाणात यात्रेकरूंची काळजी घेत आहेत. एकादशीला धापेवाडय़ामध्ये यात्रा भरणार आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने कळमेश्वर, मोहपा, काटोल, सावनेर, नागपूर या बसस्थानकांवरून यात्रेकरूंसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरवरून धापेवाडय़ाला जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.   

Story img Loader