स्वारगेट (पुणे) येथून पंढरपूरकडे निघालेली एसटी बस फलटणपासून ३ किलोमीटर अंतरावरील विडणी गावाच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावरील रावरामोशी पूल येथील धोकादायक वळणाचा चालकास अंदाज न आल्याने सरळ पूर्ण क्षमतेने भरलेल्या कालव्यात गेली. आज (शनिवार) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
नागपूर विभागातील सावनेर डेपोची ही एसटी बस असून तिचे चालक डी. एस. महाजन हे वाहक सुरेश दादारावजी घोणे (दोघेही नागपूर जिल्ह्य़ातील रहिवाशी असून पूर्ण पत्ता समजू शकला नाही.)  बस (एमएच ४० वाय. ५२२३) घेऊन पंढरपूरकडे निघाले होते. रात्री १ वाजून २५ मिनिटांनी त्यांनी फलटण बसस्थानक सोडल्यानंतर केवळ पाच मिनिटानेच हा प्रकार घडला. सदर बस चालकास रावरामोशी पुलावरील अवघड व धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने ही बस सरळ कॅनॉलमध्ये घुसली. हा प्रकार घडला त्यावेळी एसटी बसमध्ये चालक, वाहकाव्यतिरिक्त अन्य कोणीही नव्हते, अशी माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ज्यावेळी ही बस पाण्यात गेली त्यावेळी चालक त्याच्या बाजूस असलेल्या दरवाजातून, तर वाहक पाठीमागच्या संकटकालीन बाहेर पडण्याच्या खिडकीतून बाहेर पडल्याने ते बचावले. सदर बस ज्या ठिकाणी पाण्यात पडली तेथून पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही अंतर वाहत गेल्याने सदर बसचा पुढील भाग वाकडा झाला आहे. यावरून पाण्याच्या वेगाची कल्पना येईल.
तेथे अनेकदा असे अपघात झाले असून या भागातील लोकांनी रावरामोशी पुलावरील धोकादायक वळण काढून टाकावे, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अद्यापही संबंधित विभागाचे अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.

Story img Loader