थंडीचे किंवा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागते. केवळ नववर्षांचे स्वागत करण्यासाठीच नव्हे तर गुलाबी थंडीची दुलई अंगावर घेत पर्यटनाची मजा अनुभवण्यासाठी अनेकजण सहकुटुंब सैर करायला बाहेर पडतात. यंदाही कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, खासगी बसगाडय़ांमधून प्रवासी दक्षिणेकडे निघाले आहेत. खासगी गाडय़ांच्या दृष्टीने सुकाळ असलेल्या या मोसमात एसटी महामंडळाचा दुष्काळ सुरू आहे.
थंडीत दक्षिणेकडील वातावरण अधिक आल्हाददायक असते. त्यामुळेच अनेकांची पसंती दक्षिणेकडे असते. यंदा खासगी बसचालकांनी आपले दर दुप्पट वाढवले असले तरी गोवा, बंगलोर, मंगलोर, केरळ इथे जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. व्होल्वो गाडय़ा नसतील किंवा वातानुकूलित गाडय़ा नसल्या तरी चालतील इतका गारवा सध्या वातावरणात असल्यामुळे विना वातानुकूलित गाडय़ांमधून जाणाऱ्यांची संख्याही खूप आहे. चेंबूर येथे असलेल्या तिरुपती टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या रामू आर. के. यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे सप्टेंबर महिन्यातच पर्यटकांचे दक्षिणेसाठी जाणासाठी चौकशी आणि आरक्षण सुरू होते. डिसेंबर आल्यावर तर आणखी गाडय़ांची व्यवस्था करावी लागते. कधीकधी आम्ही काही टूर ऑपरेटर एकत्र येऊन गाडय़ांची व्यवस्था करतो. काहीवेळा पॅकेजेस आखावी लागतात. त्यात पर्यटनस्थळांबरोबरच जाऊन-येऊन अशी आखणी पूर्ण करावी लागते.
एकीकडे खासगी गाडय़ांनी आपले दर दुप्पट केले असूनही प्रवासी भरभरून जात आहेत. मात्र एसटी महामंडळाला मात्र दुष्काळ जाणवत आहे. कोकणात किंवा गोव्याकडे अथवा बंगलोरकडे जाण्यासाठी विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या नसल्याचे सहायक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले. नोव्हेंबर ते मार्च हा महामंडळासाठी कमी गर्दीचा हंगाम असतो. शाळांनाही विशेष सुटय़ा नसतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विशेष नसते असे त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी सध्या कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा येथे जाणाऱ्या गाडय़ा भरभरून जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये काही गावांच्या जत्रा तर काही ठिकाणी खासगी सहली निघत असतात. हिवाळ्यात गड-किल्ले पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे पुणे ते कोल्हापूर या भागात जास्त प्रवासी संख्या असते, असे ते म्हणाले.
एसटीचा दुष्काळ खासगी गाडय़ांचा सुकाळ ; रेल्वेच्याही विशेष गाडय़ा दक्षिणेकडे रवाना
थंडीचे किंवा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागते. केवळ नववर्षांचे स्वागत करण्यासाठीच नव्हे तर गुलाबी थंडीची दुलई अंगावर घेत पर्यटनाची मजा अनुभवण्यासाठी अनेकजण सहकुटुंब सैर करायला बाहेर पडतात. यंदाही कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, खासगी बसगाडय़ांमधून प्रवासी दक्षिणेकडे निघाले आहेत.
First published on: 22-12-2012 at 12:11 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S t buses under draught private buses under abundance