स्थानिक नेत्यांचा कडवा विरोध असतानाही अजितदादांच्या कृपेमुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवलेल्या जगदीश शेट्टी यांना सुरुवातीपासून स्वपक्षीय नेते व नगरसेवकांनीच निर्माण केलेल्या समस्यांमुळे मनासारखा ‘कारभार’ करणे अवघड झाले आहे. अडीच महिने राहिले तरीही मनासारखे ‘टार्गेट’ होत नसल्याने त्रस्त शेट्टी वेगवेगळे उपाय करून थकले. तेव्हा अपेक्षित लाभासाठी कार्यालयातील स्वत:ची खुर्ची बदलण्याचा सल्ला त्यांना कुणीतरी दिला, त्यानुसार त्यांचा वास्तुशास्त्रीय खुर्चीसाठी आटापिटा सुरू आहे.. गंमत अशी की त्यासाठीही त्यांना संघर्षच करावा लागतो आहे.
शेट्टी यांनी भांडार विभागाकडे नव्या खुर्चीची मागणी केली . मात्र, सध्याची खुर्ची चांगली असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी नकारघंटा दिली होती. खुर्चीचा पाय मोडलाय व ती आरामदायक नसल्याचे सांगून शेट्टींनी नव्या खुर्चीकरिता आग्रह धरला आहे. त्यासाठी लेखी पत्र नाही म्हणून भांडार विभागाकडून पूर्तता होत नाही. उगीच बोभाटा नको म्हणून शेट्टी काही लेखी पत्र द्यायला तयार नाहीत. अधिकारी ‘तशी’ खुर्ची खरेदी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या शेट्टींनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या खुर्चीतील एक आपल्या जागेवर ठेवली आहे. आगामी बैठकीपूर्वी नवीन खुर्ची जागेवर आली पाहिजे, अशी तंबी त्यांनी दिली आहे. अधिकारी पत्राच्या मागणीवर ठाम आहे. हा गमतीदार प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शेट्टी उपलब्ध होत नाहीत, केवळ बैठकीला दिसतात व अचानक गायब होतात. मोबाईल उचलत नाहीत, कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत, गोड बोलून वाटेला लावतात, यासारख्या असंख्य तक्रारी राष्ट्रवादीच्या वर्तुळातच आहे. अध्यक्ष झाल्यापासून महापौर, पक्षनेते, शहराध्यक्षांशी त्यांचे जमत नाही. शेट्टी यांच्या या वागण्यामुळे आमदार मंडळी त्यांना सुखासुखी कारभार करू देत नाहीत. समितीत महिला सदस्यांनी त्यांना जेरीस आणले आहे. आतापर्यंत कडकी अनुभवलेल्या अथवा तसे भासवलेल्या क्रिकेटप्रेमी शेट्टींना उर्वरित कालावधीत स्थायी समितीत ‘आयपीएल’ खेळायचे आहे. चांगली कामे व्हावीत म्हणून यापूर्वी मंगळवार, गुरुवार व शनिवारी समितीच्या बैठका घेऊन पाहिल्या. अनेक देवांच्या वाऱ्या करून झाल्या. मात्र, ‘लाभ’ न झाल्याने आता ते लाखमोलाची सभापतिपदाची खुर्ची बदलत असून पालिका वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. या संदर्भात, शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही.    

Story img Loader