वयाची पंचाहत्तरी गाठलेले व्रतस्थ लेखक चंद्रकांत खोत यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळय़ात या वयातही खोत यांना हक्काचे घर न देणाऱ्या राज्य सरकारच्या अनास्थेवर आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या उदासीन कारभारावर टीका करण्यात आली.
‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर आणि चंद्रकांत खोत यांची भेट झाली असता बोलण्याच्या ओघात त्यांना खोत यांच्या ७५ व्या वाढदिवसाबाबत कळले. तेव्हा साळगावकर यांनी पुढाकार घेऊन खोत यांचा अमृतमहोत्सवी सत्कार घडवून आणला. दादरमधील कित्ते भंडारी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात खोतांचा मित्रपरिवार, काही लेखक मंडळी व चाहते सहभागी झाले होते. खोत यांच्या मित्रांनी त्यांचे महाविद्यालयातील दिवस, त्यांचे राहणीमान, त्यांना संगीताची आवड कशी लागली, अशा आठवणी जागवल्या. खोत यांचा मनस्वी स्वभाव, त्यातून त्यांनी चित्रपट क्षेत्रात घेतलेली उडी, नंतर त्यांचे हिमालयाती भ्रमण, अशा आठवणींचा पटही यावेळी उलगडला गेला.
आयुष्याची संध्याकाळ उलटूनही अद्याप खोत यांना स्वत:चे घर नाही. सातरस्ता येथे एका मोडकळीस आलेल्या खोलीच्या वऱ्हांडय़ात ते राहतात. त्यांना २१ खंडांचे आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा आहे, परंतु त्यासाठी निवांतपणा देणारी जागा त्यांच्याजवळ नाही. स्वत: खोत यांची याबाबत काही तक्रार नसली, तरी या संदर्भात काही न केल्याबद्दल गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांच्यावर वक्त्यांनी टीका केली. चंद्रकांत खोत यांच्या चाहत्यांनी दिलेल्या पुस्तकांनी याप्रसंगी चंद्रकांत खोत यांची तुला करण्यात आली. ही सर्व पुस्तके विद्यार्थी उत्कर्ष मंडळाला दान देण्यात येणार आहेत. खोत यांच्या ‘दोन डोळे शेजारी’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद इंद्रायणी सावकार यांनी केला असून, त्याचे हस्तलिखित खोत यांना प्रदान करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत खोत यांनी त्यांच्या आईच्या आठवणी सांगितल्या. आईला गाडीतून तीर्थयात्रा घडवून आणण्याची माझी इच्छा होती, परंतु ती अपूर्ण राहिली, असे त्यांनी व्यथित अंत:करणाने सांगितले. सुधीर नांदगावकर, कवी अरुण म्हात्रे, पंढरीनाथ सावंत, अशोक मुळ्ये, इंद्रायणी सावकार, विनिता सिन्हा प्रभृती कार्यक्रमाला उपस्थित होते.

Story img Loader