सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या इराद्याने रिंगणात उतरलेले भाजपचे खासदार हंसराज अहीर यांच्यासमोर परंपरागत विरोधकांसोबत पक्षांतर्गत गटबाजीचे सुद्धा मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आमदार व नगरसेवकांच्या नाराजीमुळे अहीर यांना प्रारंभीच अडथळ्याच्या शर्यतीला तोंड द्यावे लागणार आहे.
गेल्या वेळी या मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. त्याच लढतीतील भाजपचे हंसराज अहीर व शेतकरी संघटनेचे नेते व आता आपचे उमेदवार वामनराव चटप हे दोघे रिंगणात राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी यावेळी सुद्धा तिरंगी लढत होईल हे स्पष्ट आहे. अहीर व चटप यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी भाजपमधील अंतर्गत गटबाजी, नेत्यांमधील भांडणे व पदाधिकाऱ्यांची नाराजी अहिरांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार, नाना शामकुळे व शोभाताई फडणवीस हे भाजपचे तीन आमदार आहेत. यापैकी मुनगंटीवार व फडणवीस यांचे अहिरांशी जमत नाही. विशेष म्हणजे, मुनगंटीवार व फडणवीस यांच्यात सुद्धा भांडण आहे. केवळ नाना शामकुळे अहिरांसोबत आहेत. शामकुळेंना जवळ केल्यामुळे हंसराज अहीर यांनी येथील महापालिकेतील बहुतांश नगरसेवक दुखावून ठेवले आहेत. अहीर व शामकुळे यांनी त्यांचा निधी वाटप करतांना दुर्लक्ष केले, असा या नगरसेवकांचा आरोप आहे. या नगरसेवकांची समजूत काढण्यासाठी भाजपचे हे नेते विश्रामगृहावर एकत्र आले. मात्र, वेगवेगळ्या कक्षात बसले. त्यामुळे नगरसेवकांना समजावणे दूरच राहिले व या नेत्यांमधील भांडणाचे दर्शन साऱ्यांना झाले.
गेल्या काही दिवसांपासून अहीर यांनी विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. या कार्यक्रमांना पक्षाचे नगरसेवक मोठय़ा संख्येत गैरहजर राहत असल्याचे दिसून आले. येथील महापालिकेत पक्षाचे १८ नगरसेवक आहेत. त्यापैकी १२ नगरसेवक अहिरांवर नाराज आहेत. गेल्या वेळी शहरातून २० हजाराचे मताधिक्य अहिरांनी घेतले होते. यावेळी पक्षाचेच नगरसेवक नाराज असल्याने अहिरांना बरीच मेहनत करावी लागणार आहे. अशा स्थितीत अहीर आता निवडणुकीला सामोरे जात आहेत. या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक शक्ती सुद्धा क्षीण आहे. लोकसभेतील प्रभावी कामगिरी व व्यक्तीगत जनसंपर्काच्या बळावर आजपर्यंत अहीर बाजी मारून नेत असले तरी यावेळी या सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचे कठीण काम अहिरांना प्रारंभी पार पाडावे लागणार आहे. गेल्यावेळी काँग्रेसकडून नरेश पुगलिया रिंगणात असल्याने त्यांच्या विरोधकांनी अहिरांच्या पारडय़ात भरभरून मते टाकली होती. यावेळी पुगलियांऐवजी पालकमंत्री देवतळे रिंगणात राहिले तर ही मते अहिरांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेला पुगलिया गट अहिरांना मदत करेल, याची आताच खात्री देता येणे कठीण आहे. त्यामुळे एकीकडे मतांची गोळाबेरीज वाढवायची व दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधकांना सांभाळण्याची कसरत अहीर यांना करावी लागणार आहे. स्वत: अहीर मात्र यावेळी सुद्धा आशावादी असून संपूर्ण देशात असलेल्या काँग्रेस विरोधी वातावरणाचा फायदा मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहेत.