कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरू झालेली ‘सचिनदेवाची जत्रा’ आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सरकली, आणि अवघ्या मुंबईला या जत्रेचे वेध लागल्यामुळे, कामाच्या दिवशी सहन कराव्या लागणाऱ्या असंख्य समस्यांतून मुंबईकरांची मुक्तता झाली.. असा दिवस पाहायला मिळणे, हे मुंबईकरांच्या दृष्टीने भाग्याचे लक्षण!.. क्रिकेटशौकिनांच्या या देवाने आज केवळ आपल्या चाहत्यांवरच नव्हे, तर अवघ्या मुंबईकरांवर उपकार करून कृपेचा प्रसादच दिला, आणि ‘देव पावल्याच्या’ भावनेने असंख्य कष्टकऱ्यांनी सचिनला मनोमन धन्यवाद दिले..
सकाळी नऊची वेळ म्हणजे, मुंबईची गर्दीने ओसंडून वाहण्याची
 वेळ. या वेळी घराबाहेर पडून रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या अनेकांना रिकामी रिक्षा मिळविण्यासाठी ताटकळावे लागते, तर उभ्याने प्रवास करण्याची शिक्षा बसच्या रांगेपासूनच सुरू होते. नेहमीच येणारा हा अनुभव मुंबईकरांच्या अंगवळणी पडलेला असल्याने, तसे झाले नाही, तरच त्याला चुकल्यासारखे वाटू लागते. असे न घडण्याचा एकच, म्हणजे रविवारचा दिवस असतो. कामाच्या कोणत्याही दिवशी असा न ताटकळण्याचा अनुभव मुंबईकरांच्या आठवणीत नाही.. आज मात्र, कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकराला चुकल्यासारखे वाटू लागले. घराबाहेर पडताच रिक्षा मिळाली, ट्रॅफिक जॅममध्ये न खोळंबता स्टेशन गाठता आले, बससाठी घराशेजारच्या स्टॉपवर रांगदेखील नव्हती, त्यामुळे बस येताच बसायला जागा मिळाली आणि स्टेशनवर पोहोचताच फलाटावर तर वेगळेच वातावरण होते. हात ताठ ठेवून आणि पावलांमधील अंतरदेखील कमीत कमी ठेवून फलाटावरच्या गर्दीत स्वतपुरती जागा मिळवून उभे राहण्याची सवय असलेल्यांना आज चक्क आरामात उभे राहण्याचे भाग्य लाभले.. कुणी कमरेवर हात घेऊन ऐटीत गप्पा मारत होते, तर कुणी गाडी येईपर्यंतच्या वेळात फलाटावर फेरफटकादेखील मारून घेतला.. गाडी येताच, ती थांबण्याआधीच पकडून जागा मिळविण्याची सराईत धडपड करणाऱ्या अनेकांचा तर आज अगदीच ‘पोपट’ झाला. धावत्या गाडीचा दरवाजा पकडून आत शिरताच, अनेक रिकाम्या जागा जणू खुणावू लागल्याने, नेहमीचा सराईत मुंबईकर आज मात्र क्षणभर गांगरूनही गेला..
दिवस दुपारकडे कलू लागल्यावर तर रस्त्यावरची गर्दीदेखील ओसरू लागली. घरोघरी टीव्ही सुरू होते, आणि अनेकांनी चक्क दांडी मारून सचिनदेवाच्या जत्रेत घरबसल्या ‘फेरफटका’ मारला. आज ‘बालदिन’ असल्याने, कामाच्या दिवशीही बाबा घरी असल्याचे बघून मुलेही सुखावली, आणि घरातच सगळ्या कुटुंबाने ही जत्रा ‘साजरी’ केली..
.. दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ांना गर्दी तर तुरळकच होती,
पण रस्त्यांच्या नजरादेखील ‘वानखेडे’कडे एकवटल्या होत्या. नेहमी चर्चगेटला उतरून पुढे दक्षिणेकडे चालू लागणारी असंख्य पावले आज उलटय़ा दिशेने चालू लागली, आणि फुटपाथवरच्या कुटुंबांची कमाई सुरू झाली. मरीन लाईन्स, चर्चगेट स्थानकाबाहेरच्या पदपथांवर आजपासून तीनचार दिवस ‘तिरंग्या’ची दुकाने दिसू लागली आहेत. सकाळी गर्दी वानखेडेकडे सरकू लागली आणि ही फिरती दुकाने थाटून बसलेल्यांच्या गालावर समाधानाची छटा पसरली. अनेक गरीबांना आज रोजगार मिळाला, आणि ‘सचिनदेव’ पावल्याच्या भावनेने त्यांनीही वानखेडेच्या दिशेने पाहात कृतज्ञता व्यक्त केली..
बसमध्ये बसायला जागा, उपनगरी रेल्वेचा आरामशीर ऐसपैस
प्रवास, रस्त्यावरच्या विक्रेत्यांची समाधानकारक कमाई, कामाच्या दिवशीही सुट्टी मारून कुटुंबातील कच्च्याबच्च्यांसोबत साजरा केलेला बालदिन, आणि त्यातही आनंदाची बाब म्हणजे, शुक्रवारी जोडून आलेली मोहरमची सुट्टी.. पुढे सेकंड सॅटर्डे आणि रविवारचा मस्त वीकएन्ड.. कधी मागूनही मिळणार असा हा दुर्मिळ ‘आनंदयोग’ जुळून येण्यासाठी देवच पावला पाहिजे.. सचिनच्या रूपाने मुंबईकरांना तो पावला.. अशा रीतीने, चाकरमानी मुंबईकरांसाठी, सचिन खरोखरीच ‘देव’ ठरला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा