शतकांचे शतक पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर पुढील वर्षी शतकोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पहिल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहील की अन्य कोणी याविषयी येथील क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. तीन जानेवारी होणाऱ्या राष्टीय मॅरेथॉन स्पर्धेच्या धावन मार्गाचे मापन करण्यास गुरूवारपासून पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपस्थितांमध्ये स्पर्धेचा प्रमुख पाहुणा कोण राहणार ही एकच चर्चा होती.
कार्यक्रमास जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल शहा, मविप्र मॅरेथॉन संयोजक समितीच्या अध्यक्षा व संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्पर्धेचे उपाध्यक्ष व संस्थेचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. आतापर्यंत संस्थेने पाच राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन केले आहे. शताब्दी वर्षांनिमित्त राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. नियमानुसार स्पर्धेचे अंतर ‘कॅलीब्रेटेड बायसिकल व्हील’ पद्धतीने मोजण्यात येणार असून अशा प्रकारे निश्चित करण्यात आलेल्या धावन मार्गावरील धावपटूचे विक्रम ग्राह्य़ धरले जातात. मागील वर्षी चंद्रपूरच्या नीलेश बोंडेने दोन तास ३१ मिनीट दोन सेकंद अशी वेळ नोंदविली होती. शताब्दी वर्षांनिमित्त यंदापासून विजयी खेळाडूंना गतवर्षांपेक्षा आकर्षक रोख बक्षिस देण्याचे संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ठरविले आहे. या स्पर्धेचा मार्ग मविप्र मॅरेथॉन चौक ते धोंडेगावपर्यंत आणि परत मविप्र मॅरेथॉन चौक असा राहणार आहे.
संस्थेसाठी अनेक कर्मवीरांचे व समाजाचे मोठे योगदान असून संस्थेचे काम शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. खेळाडूंसाठी अनेक योजना संस्था राबव्िित असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली. आरोग्यासाठी धावा व देश बलवान करा असा संदेश देऊन महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले. क्रीडा विकासासाठी आमच्या विभागाची मदत संस्थेला कायम राहील. आमच्या विभागातील पोलीस खेळाडू देखील स्पर्धेत सहभागी होतील असे आश्वासन जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक पडवळ यांनी यावेळी दिले. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल शहा यांनी स्पर्धा सुरू करणे, सातत्य ठेवणे व मोठा सहभाग वाढविणे ही संस्थेच्या दृष्टिने अभिमानास्पद गोष्ट असल्याचे
सांगितले.
संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी स्पर्धेसंदर्भातील सर्व माहिती दिली.

Story img Loader