शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने तमाम शिवसैनिकांसह सर्वपक्षीय मंडळी व सर्वसामान्य जनतेत शोककळा पसरल्याचे चित्र अवघ्या सातारा जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. शिवसैनिकांनी गहिवरलेल्या अवस्थेत प्रतिक्रिया देताना, साहेबांबद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडत असल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना, अनेकांनी असा नेता होणे नाही, शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने महाराष्ट्राचेच नव्हेतर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाल्याचे मत नोंदविले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे म्हणाले, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांची अत्यंत गरज असताना ते आपल्यातून गेले आहेत. अडचणीच्या काळात त्यांची उणीव भरून काढणे अवघड आहे. माझ्या १९८९ सालच्या कराड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत ते प्रचारासाठी आले होते. या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, साहेबांनी ‘सामना’मधील आपल्या ‘आमचे हरलेले नेते’ या लेखात माझ्या लढतीचा विशेष उल्लेख केल्याचे देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले, शिवसेना प्रमुखांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिकवणीमुळेच मी शिवसेनेकडे आकर्षित झालो. या गोरगरीब व उपेक्षितांसाठी कायम आक्रमकपणे रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचाराची ज्योत आज मावळली आहे. ढाण्या वाघ आपल्यातून निघून गेला आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झाला असून, साहेबांबद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडत आहेत.
भाजपाचे प्रांतिक कार्यकारिणीचे सदस्य अॅड. भरत पाटील म्हणाले, हिंदू धर्माचा शूर, लढवय्या असा कणखर आधारवड हरपला आहे. हिंदू हृदयसम्राट केवळ महाराष्ट्राचे व सेनेचे वलय नव्हते तर ते संपूर्ण हिंदू धर्मासाठी व राष्ट्रधर्मासाठी प्रेरणादायी होते. ते आपल्या विचाराचे आणि शब्दाचे पक्के राहिले. मी त्यांना सातआठ वेळा भेटणारा भाग्यवंत असून, त्यांचे तेज मी कधीही विसरू शकणार नाही. साहेबांसारखा लढवय्या नेता पुन्हा होणे नाही.
सेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता भावनावश झालेल्या मोहिते यांना शब्द फुटले नाहीत. आम्ही पोरके झालो म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. मलकापूरचे शहर प्रमुख नितीन काशिद म्हणाले, की शिवसैनिकांचे दैवत असलेल्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने फार मोठा आघात झाला आहे. हिंदूहृदयसम्राटांच्या विचाराची ज्योत तेवत ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद तोडकर म्हणाले, संपूर्ण देशवासीयांवर राष्ट्रनिष्ठेचे संस्कार करणारे महापुरुष आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्या संस्काराच्या वाटेने वाटचाल करावी लागेल. शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना राष्ट्रनिष्ठेचा संस्कार दिला. या संस्काराच्या शिदोरीवरच भारत महासत्ता होईल असा विश्वास तोडकर यांनी व्यक्त केला. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कोल्हापूरकडे मोटारकारने माँसाहेबांसमवेत (मीनाताई ठाकरे) साहेब महामार्गावरून चालले होते. झेड प्लस सिक्युरिटी होती. आम्ही काही शिवसैनिक कराडच्या कोल्हापूर नाक्यासमोर साहेबांना पाहण्यासाठी भगवे झेंडे हातात घेऊन उभे होतो. शिवसैनिक थांबल्याचे जाणवताच साहेबांनी गाडी थांबवली. वाहनातून खाली उतरून आमच्याशी संवाद साधला, पाठीवर मायेची थाप टाकली. आपला हा उत्साह महाराष्ट्रातील नतद्रष्ट काँग्रेस सरकार कायमचे जाण्यास कारणी ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि राज्यात युतीचा भगवा फडकल्याचा चमत्कार पाहावयास मिळाला.
भाजपाचे नितीश देशपांडे म्हणाले, की साहेबांबद्दल बोलण्यास शब्द नाहीत. महाराष्ट्राचे नव्हेतर संपूर्ण देशाचे कणखर नेतृत्व हरपले आहे. सत्तेबाहेर राहूनही सत्ताधीशांवर अंकुश कसा ठेवायचा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हिंदू हृदयसम्राट होत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे हे एक निर्भीड पत्रकार व लढवय्या संघटक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी – कलावंत, राजकारणी, गोरगरिबांचा कनवाळू पालनकर्ता, परखड विचारसणीचे पत्रकार, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, सार्वजनिक जीवन स्वच्छ व कणखरपणे व्यतीत करणारे नेते अशी महानायकाची सर्व गुणवैशिष्टय़े बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. कराडच्या चौफेर संस्थेतर्फे त्यांना आदरांजली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा