‘ढाकूमाकूम’चा ताल धरत ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर करीत थिरकणारी पावले.. वाजंत्री थांबविण्याचा इशारा करीत आकाशात लटकणाऱ्या दहीहंडीखाली जमून थरांचा घेतला जाणारा अंदाज.. आणि ‘बजरंगबली की जय’ अशी ललकारी देत एकमेकाच्या खांद्यावर उभे राहणारे गोविंदा.. खांद्यावरचे वजन न पेलल्यामुळे थरथरत कोलमडलेल्या गोविंदामुळे कोसळणारा मनोरा.. वेदनांनी विव्हळणाऱ्या जखमी गोविंदांना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेण्यासाठी उडालेली धावपळ.. आणि प्रसंगी मृत्युमुखी पडणारे गोविंदा.. असे अनेक प्रकार दहीहंडी उत्सवात घडतात. परंतु अपघाताचे प्रकार टाळून उत्सवाची मजा लुटता यावी यासाठी गिर्यारोहकांनी गोविंदांसाठी सुरक्षा कवच देऊ केले आहे. या सुरक्षा कवचाला जोड मिळणार आहे ती गिर्यारोहणाची.
गेल्या दशकामध्ये दहीहंडी उत्सवात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. सर्वात उंच दहीहंडी फोडून सर्वश्रेष्ठ बनण्याची अहमहमिका गोविंदा पथकांमध्ये लागली आहे. आपली क्षमता न ओळखताच अनेक छोटी-मोठी पथके सात-आठ थर रचण्याचा प्रयत्न करतात आणि कोसळतात. त्यात अनेक गोविंदा जायबंदी होतात. कुणाच्या हाताला, तर कुणाच्या पायाला गंभीर दुखापत होते आणि प्रसंगी कायमचेच अपंगत्व स्वीकारुन उर्वरित आयुष्य जगण्याची वेळ त्यांच्यावर येते. थर रचताना कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही गेल्या दशकात वाढली आहे. गोविंदा मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मदत केली जाते. परंतु ही मदत तुटपूंजी ठरत असून कालांतराने मृत्युमुखी पडलेला गोविंदा विस्मृतीत जाते आणि त्याच्या कुटुंबाला कायमच संकटाला सामोरे जावे लागते.
राज्य सरकारने अलिकडेच दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच महापालिकेने दहीहंडी रचताना जखमी होणारा गोविंदा आणि मृत्युमुखी पडणाऱ्याच्या नातेवाईकाला अनुक्रमे १५ हजार रुपये आणि १.५० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी दहीहंडी उत्सवात यंदा प्रचंड चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. स्पर्धेच्या नादात गोविंदा जायबंदी होऊ नयेत, त्यांना उर्वरित आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून काढावे लागू नये या उद्देशाने गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजक आणि पथकांना मदतीचा हात दिला आहे. प्रत्यक्ष दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना ‘सुरक्षा कवच’ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गोविंदांना सुरक्षा कवच देण्याची कल्पना दोन वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांकडे मांडली होती. परंतु काही आयोजकांकडून त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु गेल्या वर्षी कपिलेश्वर यांनी थेट गिर्यारोहकांनाच आवाहन करुन गोविंदांना संरक्षण देण्याची विनंती केली. त्यानुसार मुंबईत चार-पाच ठिकाणी गिर्यारोहणातील तंत्राचा अवलंब करुन वरच्या दोन थरांवरील गोविंदांना ‘सुरक्षा कवच’ उपलब्ध झाले होते. काळाचौकी येथील अभ्युदय नगरातील मैदानात सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र ट्रेकर्स या संस्थेच्या मदतीने कपिलेश्वर येथे गोविंदांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहणार आहेत. येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत आयोजित दहीहंडी सराव शिबिरात गोविंदांना सुरक्षेची कवच कुंडले लाभणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा