किती कडक उन्हाळा सुरू झालाय याच्या चर्चा घर, ऑफिस, लोकल, बसमध्ये सुरू झाल्या असल्या तरी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा छत्रीचे ओझे अनेकांना जड होत असते. मुंबईच्या दमट हवेत तापमानावर नियंत्रण राहत असल्याने उष्माघाताचा धोका फारसा नसला तरी मार्चच्या कोरडय़ा हवेत भर दुपारी कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जानेवारी-फेब्रुवारीतील गारवा हा हा म्हणता सरला आणि गेल्या आठवडय़ापासून मुंबईची हवा चांगलीच गरम होऊ लागली. हा काळ हिवाळ्यातून उन्हाळ्याचे स्थित्यंतर होण्याचा काळ आहे. अजूनही हिवाळ्याप्रमाणे वारे पूर्व, ईशान्येकडून वाहत आहेत. मात्र आता गारठय़ाऐवजी ते गरम हवा घेऊन येऊ लागले आहेत. मार्चमध्ये सरासरी तापमान ३७ अंश से. असते. तर गेल्या दहा वर्षांत मार्चमध्ये तापमानाने ४० अंश से.चा पल्लाही पार केला आहे. या काळात सूर्यकिरणे थेट काटकोनात येत असल्याने त्यांची तीव्रता अधिक असते. राज्याच्या अंतर्गत भागातील तापमान ४५ अंशांच्याही पलीकडे जाते व तेथे उष्माघाताने मृत्यूच्याही घटना घडतात. मुंबईत तशी टोकाची परिस्थिती उद्भवत नसली तरी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना किमान काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करा. अगदीच आवश्यक काम असेल तर उन्हात बाहेर पडताना टोपी, छत्री यांचा वापर करा. उकाडय़ामुळे कोणाला चक्कर आली तर त्याला सावलीत घेऊन जावे, त्याच्या डोक्यावर थंड पाण्यात भिजवलेले कापड ठेवावे, असा सल्ला डॉक्टर देतात.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास चक्कर येणे, शुद्ध हरपणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे तहानेने जीव व्याकुळ होण्याची वाट न पाहता नियमित वेळाने पाणी प्यावे.

या काळात डोळे येण्याचे प्रमाण वाढते. वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप केल्यास डोळे स्वच्छ राहण्यास मदत होते. संसर्ग झाल्यास मात्र तो दुसऱ्या डोळ्यास व इतरांना न होण्यासाठी कपडे, हात यांच्या माध्यमातून होणारा संपर्क टाळावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उकाडय़ाचा शीण कमी करण्यासाठी अनेकदा रस्त्यावरील सरबते, शीतपेय यांची मागणी वाढते. त्यामुळे काही काळापुरता उष्मा कमी होतो मात्र त्यामुळे विषाणुसंसर्गाने खोकला, सर्दी, ताप होतो. काही वेळा विषाणुसंसर्गाने पोटदुखी, जुलाब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शुद्ध पाणी तसेच फळे खाणे अधिक चांगले.