गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस आघाडी आणि युतीला पाच-पाच जागा मिळाल्या असताना यावेळी भारतीय जनता पक्ष- शिवसेना समर्थित महायुतीने एकहाती सत्ता मिळवित दहाही जागांवर भगवा फडकविला आणि काँग्रेस आघाडीला चांगलीच धूळ चारली. साऱ्या देशाचे लक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीमध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लोकसभेचे सलग आठ वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या विलास मुत्तेमवारांचा दीड लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. विदर्भाच्या इतिहासात प्रथमच सर्व जागा जिंकण्यात महायुतीला यश आले आहे.
साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला विदर्भातील विविध मतदारसंघात आज सकाळी आठ वाजेपासून प्रारंभ झाला. विदर्भातील विविध जिल्ह्यांत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेत शेवटपर्यंत वर्चस्व कायम ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर विजय मिळविला. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी, आनंदराव अडसूळ (अमरावती), नाना पटोले (भंडारा), रामदास तडस (वर्धा), प्रतापराव जाधव (बुलढाणा), भावना गवळी (यवतमाळ-वाशीम), अशोक नेते (गडचिरोली), संजय धोत्रे (अकोला), हंसराज अहीर (चंद्रपूर), कृपाल तुमाने (रामटेक) हे सर्व महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भात भाजपने नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या सहा तर सेनेने यवतमाळ-वाशीम, अमरावती, बुलढाणा आणि रामटेक या चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचा विदर्भात पूर्ण सफाया केला आहे.
सलग आठ वेळा लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. रामटेकमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी सेनेचे कृपाल तुमाने यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी तुमाने यांनी विजय मिळविला. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व असताना आणि आघाडीची एकमेव अशी जागा निवडून येण्याची अपेक्षा असताना नाना पटोले यांनी विजय मिळविला. गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली असताना ते तिसऱ्या स्थानावर होते. मात्र, यावेळी भाजपकडून त्यांनी निवडणूक लढविली हे विशेष.
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकत्यार्ंची नाराजी त्यांना भोवली. आनंदराव अडसूळ यांचा वाढता जनसंपर्कामुळे विजय झाला. अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि बुलढाणा या पाचही जागा कायम राखण्यात महायुतीला यश आले आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि रामटेक हे मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आले नाही. विदर्भातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्क्क्याने विजय मिळविला आहे. यवतमाळ मतदार संघात सेनेच्या भावना गवळी यांच्या विरोधात काँग्रेसने सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांना रिंगणात उतरविले होते. आम आदमी पक्षाने विदर्भातील दहाही जिल्ह्य़ात उमेदवार उभे केले होते मात्र त्यांचा काहीच प्रभाव पडला नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघातून अंजली दमानिया यांना गडकरी यांच्या विरोधात उतरविण्यात आले होते. मात्र, त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दमानिया यांनी गडकरी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. महायुतीला मिळालेल्या या यशामुळे विदर्भात उत्साहाचे वातावरण असून ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये जल्लोश करण्यात आला. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आणि भाजपच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे.
चंद्रपुरातून भाजपचे उमेदवार हंसराज अहीर, तर गडचिरोलीतून अशोक नेते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. या दोघांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा २ लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या दोन्ही विजयी उमेदवारांचे मताधिक्यांचे आराखडे मतदारांमध्ये असलेल्या मोदी लाटेने चुकवले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत अहीर यांनी साडेतीन लाखापेक्षा जास्त मते घेऊन निर्णायक आघाडी मिळवली होती.
काँग्रेसचे उमेदवार व राज्याचे पर्यावरण मंत्री संजय देवतळे हे तोपर्यंत १ लाख ९३ हजार मतांनी दुसऱ्या स्थानावर होते. आम आदमी पक्षाचे उमेदवार वामनराव चटप आरंभापासून तिसऱ्या स्थानावर होते. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार व गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला.
अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी राष्ट्रवादीच्या नवनीत कौर-राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार ९३२ मतांनी पराभव केला. अडसूळ यांना ४ लाख ६७ हजार २१२ मते मिळाली, तर नवनीत राणा यांना ३ लाख २९ हजार २८० मते पडली. अमरावतीत विजयाची तुतारी निनादणार, असा विश्वास महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करीत होतेच. या निकालाने बडनेराचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या वर्तूळाला जबर हादरा बसला आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार कृष्णराव गणपतराव इंगळे यांचा १ लाख ५९ हजार ५७९ एवढय़ा प्रचंड मताधिक्याने पराभव करून ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे सिध्द केले आहे. शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना ५ लाख ९ हजार १४५ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कृष्णराव इंगळे यांना ३ लाख ४९ हजार ५६६ मते मिळाली. जाधव यांनी इंगळे यांना अक्षरश: धूळ चारत दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या अंतिम अर्थात, २८ व्या फेरीत महायुतीच्या शिवसेना उमेदवार खासदार भावना गवळी यांनी ९३ हजार २९१ मतांची आघाडी घेत कांॅग्रेस उमेदवार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे याचा दणदणीत पराभव केला. भावना गवळी यांना ४ लाख ७६ हजार ८३९ मते, तर मोघे यांना ३ लाख ८३ हजार ६३८ मते मिळाली. त्यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा