तिरोडा तालुक्यातील बुचाटोला येथे गुरुवारी पाच जणांना ताब्यात घेऊन हजारोंचे सागवान ताब्यात घेतले. यावरून जिल्ह्यात सागवान तस्करी जोमात सुरू असल्याचे उघड होते. गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला असून, दिवाळीनंतर लग्नसराईने जोर पकडला आहे. त्यातच वधूला फ र्निचर देण्याची परंपरा असल्याने सध्या या व्यवसायाला सुगीचे दिवस आहेत. विशेष म्हणजे, सागाच्या फíनचरची अधिक मागणी असते व त्याला भावही चांगला मिळतो. यामुळे तस्कर सर्वाधिक सागाचे जंगल फस्त करीत आहेत. लाकडांची खरेदी केल्यावर रितसर ‘टिपी’ बनवावी लागते. हेच त्या खरेदी केलेल्या लाकडांची पावती असते. टिपीशिवाय लाकडांची वाहतूक व व्यवसायही करता येत नाही, परंतु या ‘टिपीचा’ही कसा फायदा घेता येईल, ही शक्कल तस्करांकडे आहे. ज्या टिपीवर लाकडे घेतली जातात ती जागेवरच असतात, त्या लाकडांची टिपी दर्शवून कोटय़वधींची लाकडे पास केली जात आहेत. जिल्ह्यात तिरोडा तालुक्याला लागून नागझिरा अभयारण्याचा भाग शिवाय, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी, नवेगावबांध, सालेकसा अशी वनक्षेत्र आहेत. या क्षेत्रातंर्गत लहान मोठे बिट तयार करण्यात आले आहेत. अवैध वृक्षतोड व तस्करीवर आळा घालण्यासाठी गस्ती पथकेही आहेत. मात्र, ते जंगलात गस्ती घालत नसल्याने तस्करांना मोकळे रान सापडले आहे. याचाच परिणाम बुचाटोल्याचा घटनावरून दिसून येतो. तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा येथील घनश्याम जगन्नाथ मरस्कोल्हे यांच्यासह चार आरोपींना १९ डिसेंबरच्या सकाळी सागवान तस्कर करीत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या प्रकरणाची दखल घेत वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी वनरक्षक के. बी. कापसे, एस. ए. चौधरी, मेश्राम यांना घटनास्थळी पाठविले. यावेळी त्या पाचही आरोपींना सागवान चोरताना मुद्देमालासह पकडले. दरम्यान, त्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली. असे प्रकार जिल्ह्यात हमखास सुरूच आहेत. वन अधिकारी एक दोन कारवाई करून सर्व शांत असल्याचे भासवतात. मात्र, परिस्थिती वेगळीच आहे. शिवाय, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव या तालुक्याच्या सीमा परराज्याला लागून आहेत. त्यामुळे या भागातूनही परप्रांतात सागवानाची तस्करी वाढली आहे. मात्र, कोटय़वधींची लाकडे चोरणाऱ्या तस्करांना वनविभागाचेच अभयदान मिळत आहे. ज्या आरामशीनवर लाकडे चिरली जातात, त्या ठिकाणी वन कर्मचारी अनेकदा छापे टाकतात. मात्र, चिरीमिरी घेऊन मोकळे होतात. मोठय़ा व्यावसायिकांना सोडून लहान व्यावसायिकांना व शेतकऱ्यांना अवैध लाकडांच्या नावावर धाक दिला जातो. चोरीची लाकडे घरामागे किंवा भरगच्च जंगलातच चिरून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे.
कारण, वन कर्मचारी ग्रामीण भागात न जाता केवळ लाकडे चिरणाऱ्या मिलभोवतीच घिरटय़ा घालण्याचे काम करतात. वनविभाग मात्र दूध पिणाऱ्या मांजराची भूमिका निभावत असल्याने नसíगक संपत्ती तस्करांच्या घशात जात आहे.

Story img Loader