वसई-विरार शहर महानगरपालिका (ग्रंथालय विभाग) आणि साहित्य जल्लोष संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे १७ आणि १८ जानेवारी रोजी दोन दिवसांच्या साहित्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा १६वे वर्ष आहे.
शनिवार, १७ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे यांच्या हस्ते साहित्य जल्लोषचे उद्घाटन होणार आहे. आमदार हितेंद्र ठाकूर हे सोहळ्यास अध्यक्ष, तर अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘विकासाचे वारे-आर्थिक आणि सामाजिक’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. नरेंद्र जाधव, नितीन राऊत, प्रफुल्ल साने, जगदीश राऊत, विनायक निकम, रविराज गंधे हे सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप कविसंमेलनाने होणार आहे.
रविवार, १८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत ‘बदलता मराठी सिनेमा’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात नितीन चंद्रकांत देसाई, समृद्धी पोरे, उत्तुंग ठाकूर, अभिराम भडकमकर, संजय कृष्णाजी पाटील, रविराज गंधे, संजय भुस्कुटे हे सहभागी होणार आहेत. साहित्य जल्लोषचा समारोप जीवनगाणी प्रस्तुत ‘नूतन स्मित यात्रा’ या अभिनेत्री नूतन व स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांच्या मैफलीने होणार आहे. मंदार आपटे, अर्चना गोरे, सुवर्णा माटेगावकर, सोनाली कर्णिक, ललिता ताम्हाणे हे यात सहभागी होणार आहेत.
साहित्य जल्लोषच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. वायएमसी सभागृह, माणिकपूर, वसई रोड (पश्चिम) येथे होणाऱ्या या दिवसांच्या सर्व कार्यक्रमांसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. जास्तीत जास्त रसिकांनी साहित्य जल्लोष कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा