संगीत नाटकांच्या जमान्यात संपूर्ण महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्वाची ‘मर्मबंधातील ठेव’  मुंबई मराठी साहित्य संघाने जपली आहे. संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत मानापमान, संगीत शाकुंतल आदी अनेक नाटकांमध्ये बालगंधर्वाच्या गाण्यांना साथ देणारा ऑर्गन हीच ती ‘मर्मबंधातील ठेव’ आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णयुगातील सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचा हा अनमोल ठेवा बालगंधर्वाची आठवण म्हणून साहित्य संघाने जपला आहे. बालगंधर्वाच्या ‘गंधर्व नाटक कंपनी’चा हा ऑर्गन साहित्य संघाकडे कसा आला त्याची आठवण साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव यांनी सांगितली. ही घटना सुमारे १९४१/४२ मधील आहे. कंपनीचा मुक्काम तेव्हा पुण्यात होता. तेव्हा कंपनीवर काही प्रमाणात कर्जही झाले होते. हे कर्ज वसूल करण्यासाठी पुण्यातील काही सावकारांनी न्यायालयाकडून कंपनीकडे असलेल्या सामानाच्या जप्तीची नोटीस आणली होती. कंपनीचे व्यवस्थापक पंडित तरटे हा निरोप घेऊन माझे वडील अ. ना. भालेराव आणि डॉ. भडकमकर यांच्याकडे आले. त्या दोघांनी पैसे जमा करून कंपनीकडील नेपथ्य, बालगंधर्व नाटकात वापरायचे त्या साडय़ा आणि हा ऑर्गन एवढे साहित्य जप्तीपासून वाचविले. हा ऑर्गन त्या काळी बालगंधर्वानी जर्मनीहून मागविला होता. गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, भार्गवराव पांगे आणि अन्य मंडळींनी नाटय़पदांच्या चाली बसविण्यासाठी, बालगंधर्वाच्या पदांना साथ देण्यासाठी याच ऑर्गनचा वापर केला होता. काही काळानंतर हळूहळू तो बिघडत गेला. अधूनमधून त्याची दुरुस्तीही करण्यात आली. पण आता त्याचे सुटे भाग मिळत नसल्याने त्याची दुरुस्ती होऊ शकत नसल्याने सध्या हा ऑर्गन वाजत नाही. मात्र साहित्य संघाने बालगंधर्व यांची आठवण म्हणून तो अद्याप जपला असल्याचे डॉ. भालेराव म्हणाले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़शाखेचे कार्यवाह सुभाष भागवत म्हणाले की, या ऑर्गनचा भाता उभ्या थाटाचा आहे. ‘रोझ अ‍ॅण्ड कंपनी’ने हा ऑर्गन तयार केला असून ऑर्गनवरील या कंपनीच्या नावाची पट्टी अजूनही तशीच आहे. साहित्य संघात काही वर्षांपूर्वी ‘रंगोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा हा ऑर्गन लोकांना पाहण्यासाठी मांडण्यात आला होता.

Story img Loader