महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेले काही दुर्मिळ ग्रंथ आणि अन्य पुस्तके लवकरच इ-बुक्स स्वरूपात प्रकाशित केली जाणार आहेत. नव्या पिढीसाठी माहिती-तंत्रज्ञान व इंटरनेट हा परवलीचा शब्द झाला असून नव्या पिढीला मराठी साहित्याकडे वळवणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दुर्मिळ ग्रंथ इ-बुक्स स्वरूपात कायम स्वरूपी जतन करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. १९ नोव्हेंबर १९६० रोजी साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती आणि इतिहास या क्षेत्रातील संशोधनाचे प्रकल्प, व त्यांच्या योजनांच्या पूर्ततेसाठी मदत करणे, असे संशोधन ग्रंथ स्वरूपात प्रकाशित करणे आदी उद्दिष्टांनुसार मंडळाचे काम सुरू आहे. मंडळाच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत मंडळाकडून वेळोवेळी अनेक ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. या सर्व ग्रंथांना निश्चितच संदर्भमूल्य आहे. मराठी भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक आदींना त्याचा उपयोग आहे. आता मंडळाचे काही दुर्मिळ ग्रंथ ई-बुक्स स्वरूपात प्रकाशित होत असल्याने अभ्यासकांना त्याचा अधिकाधिक लाभ घेता येऊ शकेल, असे मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.कलेची मूलतत्वे (प्रा. मिलिंद मालशे), विठ्ठल रामजी शिंदे-समग्र वाङ्मय (पहिला खंड) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि अन्य काही दुर्मिळ ग्रंथ येत्या वर्षभरात ई-बुक्स स्वरूपात प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून कर्णिक म्हणाले की, या बरोबरच ‘मी पाहिलेले यशवंतराव’ (डॉ. सरोजिनी बाबर), ‘यशवंतराव-राष्ट्रीय व्यक्तिमत्व’ (भा. कृ. केळकर), हे ग्रंथ तसेच मंडळाने जी चरित्रमाला प्रकाशित केली होती त्यातील ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडिता रमाबाई, यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोहिते, तुळशीदास जाधव ही पुस्तकेही ई-बुक्स स्वरूपात प्रकाशित केली जाणार आहेत. ‘सी-डॅक’ संस्थेचे मोलाचे सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.    

Story img Loader