एकेकाळी हातात सिगार घेऊन रूपेरी पडद्यावर वावरणाऱ्या नायकांची आपली एक शैली प्रेक्षकांनाही तोंडपाठ असायची. त्यानंतर अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ गरीब असल्याने सिगार जाऊन विडी, सिगारेट आली. मात्र, तंबाखूवर आलेल्या निर्बधांनंतर रूपेरी पडद्यावरही बंधने आली. परिणामी चित्रपटात सिगारेट ओढतानाची दृश्ये दिल्याबद्दल खुद्द अमिताभलाही टीका सहन करावी लागली. या सगळ्याचा परिणाम एकच झाला तो म्हणजे चित्रपट सुरू होण्याआधी ‘धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’ अशी पाटी झळकायला लागली. त्या पाटीतही चित्रपटाच्या कथेनुसार बदल होतात. कधी धूम्रपान तर कधी तंबाखू सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे असा हितोपदेश पाहिला की आपण चित्रपट दाखवायला मोकळे, अशी सोयही निर्मात्यांनीही क रून घेतली. पण, आपले बॉलिवूड कलाकार इतके हुश्शार की त्यांनी त्याचाही प्रसिध्दीसाठी वापर सुरू केला आहे.
नवाब सैफ अली खानने आपल्या आगामी चित्रपटासाठी ही तंबाखू सेवनाची पाटी बदलून चक्क  एक छोटेखानी दृश्यच टाकायचे ठरवले आहे. ‘गो गोवा गॉन’ या सैफ अली खान निर्मित आणि अभिनित चित्रपटात तो ‘बोरिस’ नावाच्या रशियन माफियाची भूमिका करतो आहे. या भूमिकेसाठी आपल्याला पडद्यावर धूम्रपान करायचे आहे हे समजल्यावर एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण स्वत:च धूम्रपान करू नका, असा संदेश तरूणाईला द्यावा, असे सैफला वाटले. अर्थात, या जाणिवेमागे प्रसिध्दीच्या तंत्राचा एक भाग जसा आहे तसाच तो सैफच्या स्वानुभवाचाही आहे. पाच वर्षांपूर्वी ह्रदयविकाराच्या छोटय़ाश्या धक्क्याने हलवून सोडल्यानंतर सैफने प्रत्यक्ष आयुष्यातही धूम्रपान करणे सोडून दिले. धूम्रपानाची सवय सोडणे वाटते तितके सोपे नाही, हेही तो सांगतो.
याआधी ‘बर्फी’ या चित्रपटात नायक रणबीर कपूरच्याच आवाजात धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, असा संदेश देण्यात आला होता. त्याच्यापुढे एक पाऊल टाकत सैफने एक वेगळा व्हिडिओ चित्रित करायचे ठरवले आहे. बॉलिवूडच्या सामाजिक जाणिवेचे भान जरा जास्तच वाढले तर चित्रपटाच्या आधी या संदेशासाठी एक गाणे, एखाद्या सेलिब्रिटीचे दृश्य असे आणखीनही फं डे वाढत जातील.

Story img Loader