‘बुलेट राजा’च्या निमित्ताने चर्चेत असलेल्या सैफ अली खानने आपल्याला ‘मन्सूर अली खान पतौडीं’ची व्यक्तिरेखा पडद्यावर रंगवायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेता आणि निर्माता म्हणून दोन्ही आघाडय़ांवर एकाच वेळी काम करत असलेल्या सैफने निर्मिती आणि अभिनय या दोन्ही गोष्टींचा आपण स्वतंत्रपणे विचार करत असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे सैफच्या ‘इल्युमिनेती फिल्म्स’ बॅनरची निर्मिती असलेल्या आगामी ‘फॅनी फर्नाडिस’ या चित्रपटात सैफ कु ठेही दिसणार नाही आहे.
विशाल भारद्वाजच्या ‘ओमकारा’ चित्रपटातील लंगडा त्यागीच्या भूमिकेनंतर ग्रामीण पाश्र्वभूमीवरच्या तशाच राजा मिश्रा नावाची व्यक्तिरेखा सैफ साकारतो आहे. पण सैफच्या मते ‘बुलेट राजा’ चित्रपटातील राजा शर्मा आणि लंगडा त्यागी या दोन व्यक्तिरेखांमध्ये खूप फरक आहे. लंगडा त्यागी ही व्यक्तिरेखा पूर्णपणे नकारी विचारांचीच होती. राजा मिश्राचे तसे नाही. तो ब्राह्मण कुटुंबातील उच्चशिक्षित बेरोजगार आहे. तो काही कारणांमुळे गुन्हेगारीकडे वळला असला तरी तो एकदम छानछौकीत राहणारा, मजामस्ती करणारा आणि समोरच्याला पाहताक्षणी आवडणारा असा देखणा तरुण आहे. लंगडा त्यागी व्यक्तिरेखा म्हणून एकदम कडक होती पण, म्हणून त्याच्या कोणी प्रेमात पडेल, अशी ती व्यक्तिरेखा नव्हती, असे सैफने स्पष्ट केले.
‘बुलेट राजा’ चित्रपटाचे चित्रीकरण लखनौमध्ये करण्यात आले आहे. लखनौ हे नवाबी शहर म्हणून ओळखले जाते. स्वत: नवाब असणाऱ्या सैफला काय फरक जाणवला, असे विचारल्यावर लखनौचे नवाब हे खरे श्रीमंत होते, असे सैफने सांगितले. पतौडीचे नवाब श्रीमंत नव्हते. उलट पैसे मिळवण्यासाठीच पतौडीच्या नवाबांनी क्रिकेट खेळणे सुरू केले, असेही तो म्हणतो. ‘बुलेट राजा’ किती कमाई करणार? हे माहिती नाही, पण शंभर कोटी क्लब ही आता खूपच जुनी गोष्ट झाल्याचेही सैफ ने सांगितले. दोनशे कोटी, आता हा आकडा तीनशे कोटींवर जाऊन पोहोचला, त्यामुळे पुढे कडवे आव्हान आहे, असे सांगणाऱ्या सैफने आपल्या अभिनय कारकिर्दीला पूरक म्हणूनच निर्माता बनल्याचेही सांगितले. आतापर्यंत सैफने सहा चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या अनेक बॉलीवूड कलाकार चित्रपट निर्मिती करत आहेत, अगदी अनुष्कानेही चित्रपट निर्मितीत उडी घेतली आहे. पण त्यांच्यामुळे इंडस्ट्रीलाच फायदा होतो, असे मत सैफने व्यक्त केले. सध्या सैफ साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल’ चित्रपटाचे चित्रीकरण करतो आहे. त्यानंतर ‘हॅप्पी एंडिंग’ आणि अनुराग कश्यपच्या फँटम फिल्मची निर्मिती असलेल्या चित्रपटात काम करणार असल्याचे त्याने सांगितले.

Story img Loader