त्र्यंबक- नाशिक कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना निधीचे कारण पुढे न करता एप्रिलअखेरीस सर्व यंत्रणांनी आपापली कामे पूर्ण करावीत. मात्र ही कामे करताना त्यांचा दर्जा सांभाळला जावा, अशी सूचना जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केली. प्रशासन, सर्व आखाडे आणि त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांचे सहकार्य व समन्वयाद्वारे आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. सिंहस्थ कामांचा दर्जा आणि शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचा आक्षेप घेऊन काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे साधु-महंतांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर प्रशासनाने घाईघाईने बैठकीचे आयोजन करीत साधु-महंतांना विश्वासात घेण्यासाठी धडपड चालविल्याचे अधोरेखित झाले.
त्र्यंबकेश्वर नगर पालिका सभागृहात बुधवारी विविध आखाडय़ांचे साधु-महंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्षा अलका शिरसाठ, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, षट्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंदजी महाराज, महामंत्री महंत हरिगिरीची महाराज, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी विविध आखाडय़ांचे साधु-महंत यांची बैठक झाली होती. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असून ‘केवळ एक उरकणे’ या धाटणीने ती सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
ही कामे करताना शासकीय विभागांमध्ये समन्वय नाही. काही विभाग सुरुवातीपासून निधीचा अभाव हे कारणे पुढे करीत आहेत. देशात इतर ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थासाठी मुबलक निधी मिळत असताना त्र्यंबकेश्वर येथील विकास कामांसाठी ही रडकथा का, असा प्रश्नही साधु-महंतांनी उपस्थित केला. याविरोधात थेट दिल्ली येथे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने साधु-महंतांचा रोष कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे झालेली आढावा बैठक त्याचे निदर्शक.
यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, रस्ता रुंदीकरणासह विविध कामांनी वेग घेतल्याचे सांगितले. मात्र त्याचा पाठपुरावा सातत्याने व्हावा, विकासकामांना गती देण्यासाठी दर १५ दिवसांनी या स्वरूपाची बैठक घेतली जाईल, असे नमूद केले. कामे जलदगतीने व्हावी, त्यात सुसूत्रता असावी तसेच नियोजन असावे यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.
शहरात सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या प्रलंबित कामाबद्दल बोलताना त्यांनी विकासकामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला असून आखाडय़ांच्या आवश्यकतेनुसार काही कामे आराखडय़ात समाविष्ट करण्यात येतील असे आश्वासन दिले. सर्व यंत्रणांनी कुंभमेळ्यासाठीची कामे एप्रिलअखेर पूर्ण करावी. मात्र ती कामे करताना मागील कामांची पुनरावृत्ती न होता त्यात दर्जा असावा असेही ते म्हणाले.
कुंभमेळ्याची पहिली पर्वणी पावसाळ्यात असली तरी नगरपालिकेने त्या संदर्भात नियोजन करावे. एप्रिलअखेरीस साधु-महंताचे त्र्यंबक नगरीसह शहरात होणारे आगमन पाहता सर्व आखाडय़ांना पाणी देण्याच्या दृष्टीने एप्रिलच्या आत नियोजन करावे, असे आदेश दिले.
शहरातील आखाडे आणि नागरिक यांच्या सहकार्याने विकासकामे वेळेत पूर्ण होऊन भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीस श्रीपंचदशनाम जुना आखाडा, श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी, श्रीपंचायती अटल आखाडा आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader