औसा तालुक्यातील श्रीसंत मारुती महाराज साखर कारखान्यातर्फे गुढीपाडव्यानिमित्त देण्यात येणारी साखर शेतकरी सभासदांना मान्य नाही. पूर्वीप्रमाणेच साखरेचे वाटप १९ पर्यंत करावे अन्यथा २० एप्रिलला कारखाना कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवेदनाद्वारे दिला.
श्रीसंत मारुती महाराज साखर कारखाना बेलकुंडच्या वतीने पूर्वी ५ हजारांचे शेअर्स सभासदांसाठी २५ किलो साखर व १० हजारांचे शेअर्स सभासदांना ५० किलो साखरेचे वाटप करण्यात येत होते. या वर्षी गुढीपाडव्यानिमित्त ५ हजार शेअर्स सभासदांना १० किलो व १० हजारांच्या शेअर्स सभासदांना २५ किलोप्रमाणे साखरेचे वाटप होत आहे. या पूर्वी २० रुपये प्रतिकिलोप्रमाणे साखर सभासदांना देण्यात येत होती. या वर्षी २५ रुपये किलोप्रमाणे देण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार शेतकरी सभासदांना मान्य नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनात स्पष्ट केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त २५ व ५० किलो साखरेचे वाटप यापूर्वीच्याच दरामध्ये १९ एप्रिलपूर्वी करावे अन्यथा २० एप्रिल रोजी साखर कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा प्रशासक पी. आर. फडणीस यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजेंद्र मोरे यांनी दिला. या वेळी अ‍ॅड. सचिन ढवण, तालुकाध्यक्ष सुग्रीव वळके, नारायण नडखेडकर, युसुफ शेख, मन्सुर रुईकर, शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.
पूर्वीप्रमाणेच साखरवाटप- फडणीस
यंदाही गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी सभासदांना २५ व ५० किलो साखर वाटपास मंजुरी मिळाली असून उद्यापासून (रविवार) वाटप करण्यात येणार आहे. या वाटपासाठी केंद्रावर साखर पोहोचली आहे. श्री संत मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखाना बेलकुंडच्या शेतकरी सभासदांना यापूर्वी ५ हजार रुपयांचे शेअर्स सभासदांना २५ किलो व १० हजार रुपयांच्या शेअर्स सभासदांना ५० किलो साखरेचे वाटप केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त काही तांत्रिक त्रुटीमुळे वाटप झाले नाही. काही ठिकाणी ५ हजारच्या शेअर्स सभासदांना १० किलो व १० हजारच्या शेअर्स सभासदांना २५ किलोप्रमाणे वाटप करण्यात आले. यातील तांत्रिक अडचणी सोडवण्यात प्रशासक व प्रशासन मंडळाला यश आले आहे. याप्रमाणे कारखान्याच्या वतीने शुक्रवारी आदेश काढले आहेत. रविवारपासून ५ हजारच्या शेअर्स सभासदांना २५ किलो व १० हजार रुपयांच्या शेअर्स सभासदांना ५० किलोप्रमाणे साखर वाटप होणार आहे. सभासदांनी वाटप केंद्रातून साखर घ्यावी, असे आवाहन प्रशासकीय पी. आर. फडणीस यांनी केले आहे.