शांत झाला असे वाटत असतानाच साक्री विरूध्द धुळे यांच्यातील पाणीप्रश्नाने पुन्हा उसळी घेतली असून साक्री तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातून धुळ्यासाठी आरक्षित १६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास संघटीतपणे विरोध करून परिसरातील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचा फौजफाटा परतवून लावला. तालुक्यातील विविध प्रकल्पांमध्ये आरक्षित पाण्याबाबत मुंबई येथे २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीतच याप्रश्नी आता निर्णय होणार आहे.
मालनगाव प्रकल्प कान नदीवर असून साठवण क्षमता ४०० दलघफू आहे. यापैकी १६० दलघफू पाणी धुळे शहरासाठी आरक्षित असते. परंतु यंदा साक्री तालुक्यात पाऊस कमी झाल्याने प्रशासन आणि राजकीय मंडळींनी मालनगाव आणि अन्य प्रकल्पातील पाणी धुळ्यासाठी सोडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, धुळे महापालिकेने पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस अशी कायमस्वरुपी योजना आखावी, दरवेळी दुसरीकडून पाणी मागण्यापेक्षा स्वत:ची साठवण क्षमता वाढविली तर शहरवासियांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, असे आ. अमरीश पटेल यांनी ठणकावले होते. हाच धागा पकडून साक्रीचे आ. योगेश भोये यांनीही धुळे शहराला पाणी देण्यास विरोध दर्शविला. सर्वपक्षीय कार्यकर्ते-नेत्यांनी ‘साक्री तालुका पाणी बचाव संघर्ष समिती’ स्थापन करून महामोर्चा काढला.
इतके सारे झाल्यानंतरही प्रशासनाने मालनगाव, जामखेली आणि लाटीपाडा या प्रकल्पांमधून धुळे शहरासाठी एक हजार दलघफू पाणी आरक्षित केल्याचे सांगितले गेले. पालकमंत्री सुरेश शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही धुळ्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झाला नाही. मुंबई येथील बैठकीतच यासंदर्भात निर्णय होण्याचे सांगण्यात आले.  
दरम्यान पूर्वकल्पना न देता पाटबंधारे विभागाचे अधिकारी मालनगाव प्रकल्पस्थळी पोहोचले. धुळे शहरासाठी पाणी सोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजताच मालनगाव, खरडबारी, बोडकी खर्डी, बर्डीपाडा येथील ग्रामस्थ संघटीतपणे प्रकल्पस्थळी पोहोचले. पाणी बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक सुभाष काकुस्ते यांचाही त्यात समावेश होता.
सर्व जणांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील मालनगाव, लाटीपाडा, जामखेली धरणातील पाणी आरक्षणाला एकमुखी विरोध केला. संघर्ष समितीला पूर्वसूचना न देता किंवा विश्वासात न घेता पाणी सोडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते,  असा इशारा देण्यात आला. साक्री तालुक्यातील
जनतेच्या वतीने लेखी निवेदन देवून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचा ताफा परतवून लावला.

Story img Loader